Advertisement

शेड्युल केचा गैरवापर करणाऱ्या डॉक्टरांना चाप, एफडीए घेणार झाडाझडती


शेड्युल केचा गैरवापर करणाऱ्या डॉक्टरांना चाप, एफडीए घेणार झाडाझडती
SHARES

डॉक्टरांकडून 'शेड्युल के'च्या कायद्याचा गैरवापर करत औषध विक्रीतून सर्रासपणे रूग्णांची आर्थिक लूट केली जात आहे. आता मात्र 'शेड्युल के' च्या गैरवापरला चाप बसणार असून रूग्णांची आर्थिक लूट थांबणार आहे. कारण आता डॉक्टरांकडून 'शेड्युल के'चे पालन होत आहे का? 'शेड्युल के'च्या तरतुदींचे उल्लंघन होत नाही ना? याची तपासणी आणि  डॉक्टरांची झाडाझडती अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून घेतली जाणार आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच एफडीएकडून जारी करण्यात आले आहेत.


'शेड्युल के' म्हणजे काय?

औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार औषध विक्रीसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नोंदणी आणि परवानाधारक फार्मासिस्टच्या उपस्थितीतच परवाना-नोंदणीधारक औषध विक्रेत्यांना औषध विक्री करता येते. त्याचवेळी 'शेड्युल के'च्या तरतुदीअंतर्गत डॉक्टरांनाही अत्यावश्यक औषधांचा आवश्यक तितकाच साठा करत त्या औषधांचा वापर केवळ आणि केवळ रूग्णांसाठी करणे बंधनकारक आहे. या औषधांची विक्री डॉक्टरांना करता येत नाही.


असे होते 'शेड्युल के'चे उल्लंघन

गेल्या काही वर्षांत डॉक्टर 'शेड्युल के'च्या नावाखाली भरमसाठ औषध खरेदी थेट डिस्ट्रीब्युटर्सकडून कमी भावात करत औषधांचा साठा करून ठेवत आहेत. तर या औषधांची विक्री थेट रूग्णांना दामदुप्पटीत करत 'शेड्युल के'चे उल्लंघन करत आहेत. तर एकाच रूग्णालयात एका पेक्षा अधिक डॉक्टर असतात. अशावेळी एका परवानाधारक डॉक्टरच्या आड इतर डॉक्टरही औषधांची विक्री करत असून ही औषध विक्री औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याचेच उल्लंघन आहे.


एफडीएचे आतापर्यंत दुर्लक्ष

जिथ-जिथे औषधांचा संबंध येतो, तिथे औषध-सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन होत नाही ना? या कायद्याची योग्य अंमलबजावणी होते का? हे तपासत आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार एफडीएला आहेत. मात्र, प्रत्यक्षात डॉक्टरांची तपासणी करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगत एफडीएकडून याविरोधात आतापर्यंत कारवाई केली जात नव्हती.


आता चाप बसणार

या पत्रानुसार तब्बल नऊ महिन्याने का होईना, पण एफडीएला जाग आली असून एफडीएने आता डॉक्टरांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 26 सप्टेंबरला यासंबंधीचे पत्र जारी करत एफडीएने संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आहेत. तर आता रूग्णालयातील सर्वच डॉक्टरांना औषध विक्री परवाना 'शेड्युल के'साठी आवश्यक असणार आहे. या धर्तीवर आता 'शेड्युल के'चे उल्लंघन करत औषध विक्रीचा काळाधंदा करणाऱ्या डॉक्टरांना चाप बसेल, असे म्हणत या निणर्याचे आता सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.



हेही वाचा

जागतिक ह्रदय दिन विशेष - एका ह्रदयाची किंमत!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा