Advertisement

म्हाडा लॉटरी - महागडी घरे, नको रे बाबा!


म्हाडा लॉटरी - महागडी घरे, नको रे बाबा!
SHARES

म्हाडाच्या 812 घरांसाठी 63 हजारांहून अधिक अर्ज सादर झाले असून हा प्रतिसाद मागील आठ वर्षातील सर्वात कमी प्रतिसाद असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता म्हाडाच्या महागड्या घरांना अर्जदारांनी नाकारल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. कारण, उच्च उत्पन्न गटासाठी यंदा 338 घरे असताना या घरांसाठी केवळ 5 हजार 360 अर्ज आले आहेत. म्हणजेच, उच्च गटातील एका घरासाठी केवळ 15 अर्जदार स्पर्धेत आहेत.

उच्च घरांना नाकारतानाच सर्वसामान्य, अत्यल्प आणि अल्प गटातील अर्जदारच म्हाडाचा खरा आणि मोठा ग्राहक आहे हेही यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यल्प गटासाठी अल्प गटातील घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यल्प गटासाठी केवळ 8 घरे असताना या 8 घरांसाठीही सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. 8 घरांसाठी तब्बल 9099 अर्ज सादर झाले आहेत. म्हणजेच या गटातील एका घरामागे तब्बल 1137 अर्जदार स्पर्धेत असून या गटातील लॉटरीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

अत्यल्प गटापाठोपाठ म्हाडाचा सर्वात मोठा ग्राहक म्हणजे अल्प गट. या गटासाठी तसे म्हणायला यंदाही फारच कमी 192 घरे आहेत. या 192 घरांसाठी 32 हजार 725 अर्ज सादर झाले आहेत. म्हणजेच अल्प गटातील एका घरामागे 170 अर्जदार स्पर्धेत असणार आहेत.


महागडी घरे, नको रे बाबा!

यंदा म्हाडाची मध्यम गटातील घरे महाग आहेतच, पण त्यातही उच्च गटातील घरांच्या किंमती तर खासगी विकासकांच्या घरांपेक्षाही महाग आहेत. त्यामुळेच 338 घरांपैकी 204 घरे ही कोट्यवधीच्या पुढची आहेत. म्हणूनच या घरांना सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. मध्यम गटासाठी 281 घरे असताना, या घरांसाठी केवळ 16 हजार 170 अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे या घरांसाठी म्हणावी तशी स्पर्धा अर्जदारांमध्ये नाही. कारण या गटातील एका घरामागे केवळ 57 अर्जदार स्पर्धेत असणार आहेत.

तर, यंदा सर्वाधिक घरे ज्या उच्च गटासाठी होती त्या उच्च गटासाठीच सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 338 घरे असताना या घरांसाठी फक्त 5 हजार 360 अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजेच उच्च गटातील एका घरामागे 15 अर्जदारच स्पर्धेत असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोअर परळमधील ज्या दोन 1 कोटी 95 लाखांच्या घराकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्या घरांसाठीही प्रतिसाद मिळालेला नाही. कारण या दोन घरांसाठी अंदाजे 100 अर्ज सादर झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, गुरूवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असला, तरी अजूनही राज्यभरातून डीडीच्या माध्यमातून सादर झालेल्या अर्जांचा अंतिम आकडा म्हाडाला प्राप्त झालेला नाही. हा अंतिम आकडा शनिवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असले, तरी शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 63 हजार 344 अर्ज सादर झाले आहेत. हा आकडा किमान सात हजारांनी वाढेल अशी शक्यता म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने अर्जाचा आकडा 70 हजारांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


गट
घरे
एका घरामागे आलेले अर्ज
एकूण अर्ज
अत्यल्प गट
8
1137
9099
उच्च गट
338
15
5360
अल्प गट
192
170
32,725
मध्यम गट
281
57
16170




हेही वाचा 

म्हाडाच्या लाॅटरीची प्रतिक्षा संपली, आता 10 नोव्हेंबरला लॉटरी

स्वप्नांच्या पलिकडले! लोअर परळच्या घराची किंमत २ कोटींवर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा