Advertisement

महारेराचा कांबार बिल्डरला दणका, पहिल्यांदाच होणार बिल्डरच्या मालमत्तेचा लिलाव

महारेराच्या आदेशानुसार ग्राहकाची ४० लाखांची थकबाकी देण्यास स्पष्टपणे नकार देणाऱ्या कांबार बिल्डरला अखेर महारेरानं दणका दिला आहे. त्यानुसार या बिल्डरच्या आंबिवलीतील फाल्को वुडशायर प्रकल्पातील रुपये ५१ लाख ८८ हजार ८९० किंमतीच्या ४ फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी अखेर कल्याण तहसीलदारांनी जाहिरात प्रसिद्ध केली असून येत्या २१ फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे.

महारेराचा कांबार बिल्डरला दणका, पहिल्यांदाच होणार बिल्डरच्या मालमत्तेचा लिलाव
SHARES

महारेरा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून मुंबईसह राज्यातील अनेक ग्राहकांना न्याय मिळाला असून फसव्या बिल्डरांना दणकाही बसत आहे. महारेरा कायद्यानुसार बिल्डरांवर कारवाई करणाऱ्या महारेरानं आता आडमुठ्या बिल्डरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कारवाईचा फास आणखी कडक करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार या कारवाईच्या जाळ्यात अडकला आहे कल्याण, आंंबिवलीमधील कांबार बिल्डर. महारेराच्या आदेशानुसार ग्राहकाची ४० लाखांची थकबाकी देण्यास स्पष्टपणे नकार देणाऱ्या कांबार बिल्डरला अखेर महारेरानं दणका दिला आहे. त्यानुसार या बिल्डरच्या आंबिवलीतील फाल्को वुडशायर प्रकल्पातील रुपये ५१ लाख ८८ हजार ८९० किंमतीच्या ४ फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी अखेर कल्याण तहसीलदारांनी जाहिरात प्रसिद्ध केली असून येत्या २१ फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आडमुठ्या बिल्डरची मालमत्तेचा लिलाव करण्याची ही महारेराच्या इतिहासातील पहिली कारवाई असणार आहे.


ताबा देण्यास टाळाटाळ

आंबिवली कांबार बिल्डरच्या फाल्को वुडशायर प्रकल्पात प्रज्ञा साबळे यांनी घर खरेदी केलं. त्यानुसार घराची काही टक्के रक्कमही भरली. रक्कम भरून कित्येक महिने उलटले तरी घराचा काही ताबा मिळेना म्हणून साबळे यांनी बिल्डरकडे घराची रक्कम परत मागितली. पण बिल्डरने रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेवटी साबळे यांनी महारेरात तक्रार दाखल केली. महारेराच्या चौकशीत बिल्डर दोषी आढळला. त्यानुसार महारेरानं साबळे यांची रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ही रक्कम ४० लाखांच्या घरात गेली.


महारेराचे आदेश धुडकावले

कांबार बिल्डरने मात्र महारेराचे आदेश धुडकावत साबळे यांना ४० लाख रूपये परत देण्यास नकार देत अपिलीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. मात्र इथेही निकाल बिल्डरच्या विरोधात गेला. अपिलीय न्यायाधिकरणाच्या निर्णयालाही हरताळ फासत बिल्डरने मुजोरी कायम राखत साबळेंची ४० लाखांची रक्कम परत केलीच नाही. त्यामुळे साबळे यांनी यासंबंधी महारेराकडे तक्रार केली असता महारेराने या मुजोर बिल्डरच्या गळ्याभोवतालचा फास आणखी आवळला. बिल्डरची जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार महसुल विभागातर्फे नोटीस बजावत कांबार बिल्डरच्या आंबिवलीतील प्रकल्पाची मालमत्ता ताब्यात घेत बिल्डरला सहा महिन्यांपूर्वी दणका दिला.


२१ फेब्रुवारीला लिलाव

या दणक्यानंतरही बिल्डरचा मुजोरीपणा कमी झाला नाही. त्यामुळे आता बिल्डरच्या आंबिवलीतील प्रकल्पातील ४ फ्लॅटचा लिलाव करण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता कल्याण तहसीलदाराच्या कार्यालयामध्ये ४ फ्लॅटचा लिलाव होणार आहे. या चारही फ्लॅटची एकूण रक्कम ५१ लाख ८८ हजार ८९० रुपये इतकी आहे. तर यातील एक फ्लॅट १५ लाख ९ हजार ५९५ रुपये किंमतीचा आणि ५२.६४ चौ. मीटरचा, दुसरा १६ लाख ९२ हजार ८८० रुपये किंमतीचा आणि ५९,०३ चौ.मीटरचा, तिसरा १७ लाख ३० हजार ८४१ रुपये किंमतीचा आणि ६०.३५ चौ. मीटरचा तर चौथा १७ लाख २६ हजार १६० रुपये किंमतीचा आणि ६०.१९ चौ. मीटरचा असा आहे. 


बिल्डरांना चाप

या ५१ लाख ८८ हजार रुपये किंमतीच्या मालमत्तेच्या लिलावातून मिळणार्या रक्कमेतून साबळे यांची थकबाकी देण्यात येणार आहे. तर  या प्रकरणासाठी जो खर्च आला तो खर्च उर्वरित रक्कमेतून वसुल केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान महारेरा लागू झाल्यापासून पहिल्यांदाच बिल्डरच्या लिलावाची कारवाई होणार असून ही कारवाई मोठी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर या कारवाईमुळे इतर बिल्डरांना नक्कीच चाप बसेल असा विश्वासही व्यक्त होत आहे. 



हेही वाचा -

नवाजुद्दीन-सान्याच्या 'फोटोग्राफ'चा फर्स्ट लुक!

हार्दिक-के. एल राहुलच्या वादावर करण जोहरनं सोडलं मौन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा