Advertisement

सर्वेक्षणानंतरच होईल जागेवर बोलणी, म्हाडाने केलं मोतीलालनगरवासीयांना आश्वस्त


सर्वेक्षणानंतरच होईल जागेवर बोलणी, म्हाडाने केलं मोतीलालनगरवासीयांना आश्वस्त
SHARES

मोतीलाल नगरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण (socio-economic survey) पूर्ण झाल्यानंतरच पुनर्विकासाअंतर्गत त्यांना किती क्षेत्रफळाची घरे देण्यात येतील हे ठरवण्यात येईल, असं आश्वासन म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिलं. 

काही महिन्यांपूर्वी म्हाडा अधिकाऱ्यांनी मोतीलाल नगरमधील रहिवासी संघटनांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत म्हाडाकडून रहिवाशांना ठराविक क्षेत्रफळाची जागा देण्यात येईल, अशी ढोबळ माहिती देण्यात आली होती. ही माहिती परस्परविरोधी असल्याने रहिवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा संभ्रम दूर करण्यासाठी म्हाडाच्या वतीने सोमवारी मोतीलाल नगर क्र. १ मधील गणेश मैदान इथं पुनर्विकासासंदर्भातील सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. 

हेही वाचा- रहिवाशांना विश्वासात घेऊनच मोतीलाल नगरचा पुनर्विकास, म्हाडाचं स्पष्टीकरण

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले, रहिवाशांना विश्वासात घेऊनच म्हाडाला मोतीलाल नगरचा पुनर्विकास करायचा आहे. या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाने रहिवाशांचं सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्याचं ठरवलं आहे. या सर्वेक्षणामुळे एका घरात किती व्यक्ती, कुटुंब रहात आहेत. त्यांना किती जागेची आवश्यकता आहे, हे कळण्यास मदत होईल. सर्वेक्षणातून ठोस आकडेवारी समोर आल्यानंतरच रहिवाशांसोबत सल्लामसलत करून पुनर्विकासाचा आराखडा बनवण्यात येईल. नियमानुसार रहिवाशांना किती क्षेत्रफळाची जागा देता येईल, हे सुद्धा त्यानंतरच कळू शकेल. त्यामुळे म्हाडा आता तरी जागेचं कुठलंही आश्वासन रहिवाशांना देणार नाही. तेव्हा रहिवाशांनी या सर्वेक्षणास सहकार्य करावं.


या कार्यक्रमात प्रकल्प सल्लागार समिती पी.के. दास असोसिएट्सचे प्रमुख पी.के.दास यांनी पुनर्विकास प्रकल्पाचं सादरीकरण केलं. पुनर्विकासाच्या माध्यमातून मोतीलाल नगरमध्ये मायक्रो सिटी उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्यात रहिवासी इमारतींसोबतच शाळा-काॅलेज, मार्केट, सिनेमागृह, मैदान, वुमन हाॅस्टेल, प्रार्थनास्थळांचा देखील समावेश असेल, असं ते म्हणाले. 

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर १,२,३ या १४३ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास करण्याचं काम म्हाडा प्राधिकरणाने हाती घेतलं आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाला ४० हजार नवीन घरं उपलब्ध होणार आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा