रहिवाशांना विश्वासात घेऊनच मोतीलाल नगरचा पुनर्विकास, म्हाडाचं स्पष्टीकरण

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतीच्या प्रस्तावित पुनर्विकासास मोतीलाल नगर १,२,३ मधील काही संस्थांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे.

SHARE

गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतीच्या प्रस्तावित पुनर्विकासास मोतीलाल नगर १,२,३ मधील काही संस्थांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. परंतु रहिवाशांना या प्रक्रियेत पूर्णपणे विश्वासात घेऊन म्हाडा प्राधाकरणच मोतीलाल नगरचा पुनर्विकास करणार, असा खुलासा म्हाडाकडून करण्यात आला आहे. 

रहिवाशांच्या मागण्या

मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबद्दल स्थानिक रहिवाशांचं नेमकं म्हणणं काय आहे? हे जाणून घेण्यासाठी म्हाडाने रहिवासी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी सर्वेक्षण तसंच इतर प्रक्रियेबाबत म्हाडाने रहिवाशांना विश्वासात घेऊनच हालचाली कराव्यात, अशी आग्रही भूमिका मांडली. सोबतच कॉर्पस फंड, जादा क्षेत्रफळ आणि घरांचे विविध पर्याय अशा मागण्याही रहिवाशांकडून करण्यात येत आहेत.

संशयाचं वातावरण

या बैठकीत मोतीलाल नगर विकास समितीचे अध्यक्ष युवराज मोहिते म्हणाले की, रहिवाशांची अचूक संख्या समजण्यासाठी म्हाडाने रहिवाशांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच सर्वेक्षण सुरू केलं. यामुळे रहिवाशांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यातून विरोध वाढत गेला आणि सर्वेक्षण थांबवण्यात आलं. त्यामुळे म्हाडाने सर्वेक्षण किंवा अन्य सर्व प्रक्रियांविषयी रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांना स्पष्ट कल्पना दिल्यास म्हाडाला पूर्ण सहकार्य दिले जाईल.

मागण्यांवर सकारात्मक विचार

त्यावर खुलासा करताना म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधु चव्हाण म्हणाले की, मोतीलाल नगरचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी म्हाडा सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसंच रहिवाशांच्या मागण्यांचा सकारात्मकपणे विचार केला जाईल.

‘असा’ असेल प्रकल्प

मोतीलाल नगरचा पुनर्विकास म्हाडाकडून व्हावा, असा आदेश उच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना आधीच दिला आहे. त्यानुसार म्हाडाने पुनर्विकासाची पूर्वतयारी सुरू केली आहे. म्हाडाच्या योजनेनुसार मोतीलाल नगरमधील १४२ एकर जागेवर छोटं शहर उभारलं जाईल. या प्रकल्पात सुमारे ४० हजार घरे बांधण्याचा म्हाडाचा मानस आहे. या प्रकल्पात रहिवाशांच्या घरांसोबत शाळा, उद्याने, बाजारपेठा, रुग्णालय आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील. सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असेल.  हेही वाचा-

म्हाडाची मास्टर लिस्ट आता आॅनलाइन, रहिवाशांची फसवणूक थांबवणार

गिरणी कामगारांना बेलापूर, उरणमध्ये घरं द्यावी, राधाकृष्ण विखे-पाटील यांचा अजब सल्लासंबंधित विषय
ताज्या बातम्या