'झोपु'चा म्हाडाला दणका

वांद्रे - वांद्रे रेक्लमेशन परिसरात असलेल्या म्हाडाच्या जागेवर, म्हाडा संक्रमण शिबिरालगत वसलेल्या झोपडपट्टीचा पुनर्विकास गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलाय. हा रखडलेला पुनर्विकास आता म्हाडासाठीच डोकेदुखी ठरलाय. कारण पुनर्विकासासाठी परवानगी घेऊनही वर्षानुवर्ष काम सुरू न केल्याचा ठपका झोपु प्राधिकरणानं आता म्हाडावर ठेवलाय. इतकंच नव्हे, तर म्हाडाला थेट कामचुकार, फसव्या बिल्डरांच्या यादीत नेऊन बसवलंय. एनओसी घेऊनही काम सुरू न करणाऱ्या 114 बिल्डरांना झोपु प्राधिकरणानं दणका देत नोटीसा पाठवल्यात. त्यात म्हाडाचाही समावेश आहे. म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांच्या नावेच नोटीस बजावण्यात आलीय. पण, या नोटीशीमुळे वर्षानुवर्षे पुनर्विकासासाठी रखडलेले झोपडपट्टीवासीय खुश आहेत. या नोटीशीला 15 दिवसांच्या आत म्हाडानं उत्तर देणं अपेक्षित आहे. पण म्हाडा अद्याप आपल्या हाती ही नोटीसच पडली नसल्याचं सांगतेय. असं असलं तरी म्हाडानं पुनर्विकास कोणत्या अडचणींमुळे रखडला याचा पाढा वाचायला मात्र सुरुवात केलीय.

Loading Comments