Advertisement

रहिवाशांच्या आणि मुंबई लाइव्हच्या पाठपुराव्याला अखेर यश


रहिवाशांच्या आणि मुंबई लाइव्हच्या पाठपुराव्याला अखेर यश
SHARES

प्रतिक्षानगरमधील म्हाडा वसाहतीतील चैतन्य आणि माऊली सोसायटीमधील संरक्षण भिंतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेली तीन वर्षे ही संरक्षक भिंत बांधण्यास टाळाटाळ करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळ तसेच मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अखेर संरक्षण भिंतीची जबाबदारी स्वीकारत भिंत बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दुरूस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली. संरक्षक भिंतीचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी गेली दोन महिने चैतन्य आणि माऊली सोसायटीतील रहिवासी तसेच मुंबई लाइव्ह म्हाडाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

[हे सुद्धा वाचा - 'मुंबई लाइव्ह'च्या दणक्यानंतर म्हाडाला आली जाग]

मुंबई मंडळाच्या 2011 च्या सोडतीतील प्रतिक्षानगरमधील घरांचा ताबा 2013 मध्ये विजेत्यांना देण्यात आला. ताबा मिळाल्याबरोबर विजेत्यांनी हक्काच्या घरात प्रवेश केला खरा, पण काही महिन्यांतच येथील चैतन्य, माऊलीसह अन्य सोसायट्यांमधील विजेत्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. कारण भिंतीला तडे, सिलिंगमधून गळती, पिलरला गळती, ड्रेनेज लाइनला गळती, लाद्या निखळलेल्या अशा परिस्थितीत राहण्याची वेळ काही दिवसांत या विजेत्यांवर आली. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चैतन्य आणि माऊली सोसायट्यांच्यामधून मूळ आराखड्यानुसार एक संरक्षण भिंत बांधावयी होती. मात्र ही संरक्षक भिंतच म्हाडाने न बांधल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तीन दुकानांमुळे ही भिंत बांधता येत नसल्याचे म्हाडाकडून सांगितले जात होते. तर रहिवासी मात्र हे दुकानदार अपात्र असल्याचे म्हणत त्यांना काढून भिंत बांधण्याची मागणी करत होते. पण म्हाडा याकडे कानाडोळा करत होती.

[हे सुद्धा वाचा - बिल्डिंग उभी केली, भिंत कोण बांधणार?]

त्यामुळे या रहिवाशांनी थेट मुंबई लाइव्हकडे धाव घेतली. मुंबई लाइव्हने 7 मार्च रोजी यासंबंधीचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. म्हाडाच्या बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, तीन वर्षातच इमारतींची कशी दुरवस्था होत आहे. हे या वृत्तातून सविस्तरपणे मांडण्यात आले होते. या वृत्तानंतर खडबडून जाग आलेल्या म्हाडाने दुसऱ्याच दिवशी इमारतीच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली. हे काम अजूनही सुरू आहे. पण संरक्षक भिंतीचा प्रश्न मात्र मार्गी लागत नसल्याने मुंबई लाइव्हसह रहिवासी सातत्याने म्हाडाकडे पाठपुरावा करत होते. अखेर गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी याची दखल घेत बुधवारी मंत्रालयात म्हाडा अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची बैठक बोलावली. या बैठकीत इमारतीच्या दुरूस्तीसह संरक्षक भिंतीचा प्रश्न त्वरीत निकाली काढण्याचे आदेश वायकरांनी दिल्याची माहिती येथील रहिवाशांनी हसमुख शेलार यांनी दिली आहे.

संरक्षक भिंत बांधण्यातील अडचणी आठवड्याभरापूर्वीच दोन्ही मंडळांनी एकत्र बसून दूर केल्या आहेत. त्यानुसार दुकानांना स्थलांतरीत करण्याची जबाबदारी दुरूस्ती मंडळाने तर संरक्षक भिंत बांधण्याची जबाबदारी मुंबई मंडळाने स्वीकारल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. त्यामुळे आता संरक्षक भिंतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आणि रहिवाशांना दिलासा मिळणार हे नक्की.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा