
पार्किंगची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये वाहनांची संख्या वेगाने वाढत असली, तरी पार्किंगसाठी उपलब्ध जागा मात्र कमी होत चालली आहे.
परिणामी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग, प्रवासाचा वाढलेला कालावधी आणि नागरिकांचा वाढता त्रास हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
मुंबईसारख्या शहरात प्रत्येक चौरस फूट जागेची किंमत प्रचंड असल्याने पारंपरिक पार्किंग व्यवस्था आता अपुरी ठरत आहे. त्यामुळे विकासक, नगररचनाकार आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञ आता 'ऑटोमेटेड पार्किंग सिस्टिम (APS)' या आधुनिक पर्यायाकडे वळत आहेत.
ऑटोमेटेड पार्किंग सिस्टिममध्ये वाहनचालकाला पार्किंगच्या विविध मजल्यांवर वाहन चालवत नेण्याची गरज नसते.
लिफ्ट, पॅलेट, कन्व्हेयर आणि इतर स्वयंचलित यंत्रणांच्या मदतीने वाहन सुरक्षितपणे पार्क केले जाते आणि आवश्यकतेनुसार पुन्हा बाहेर आणले जाते.
या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जागेचा अधिक कार्यक्षम वापर. पारंपरिक पार्किंगच्या तुलनेत त्याच जागेत अधिक वाहनांची पार्किंग करता येते. त्यामुळे पुनर्विकास प्रकल्प, व्यावसायिक संकुले, मिश्र वापराच्या इमारती आणि दाट लोकवस्तीच्या निवासी भागांसाठी ही प्रणाली अधिक उपयुक्त ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या महानगरांतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांची गरज असून, ऑटोमेटेड पार्किंग सिस्टिम हा त्यासाठी प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
