Advertisement

लोअर परळ उड्डाणपुलाची एक लेन 'या' महिन्यापर्यंत खुली होणार

देखभालीसाठी हा पूल २४ जुलै, २०१८पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला.

लोअर परळ उड्डाणपुलाची एक लेन 'या' महिन्यापर्यंत खुली होणार
SHARES

लोअर परळ रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या उड्डाणपुलावरील एक मार्गिका मे अखेरपर्यंत खुली केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेला हा लोअर परळ पूर्ण पूल जुलैपर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे.

लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याच्या कारणास्तव देखभालीसाठी २४ जुलै, २०१८पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. यामुळे पादचाऱ्यांना करी रोडहून वरळी नाका आणि त्यापुढे जाण्यासाठी थेट मार्ग नाही. त्यामुळे अनेक जण वरळी नाक्यापर्यंत चालतच जातात.

तर वाहनचालकांना भायखळामार्गे जाऊन वळसा घालावा लागतो. त्यात प्रचंड हाल होतात. याशिवाय गणपतराव कदम मार्ग, आर्थर रोड तुरुंग मार्ग, वरळी नाका, सेनापती बापट मार्ग याशिवाय करी रोड, लोअर परळ परिसरातील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

पश्चिम रेल्वे आणि मुंबई महापालिकेने फेब्रुवारी, २०१९मध्ये रेल्वे हद्दीतील या पुलाचा भाग तोडण्याच्या कामाला सुरुवात केली. या पुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम जून, २०१९मध्ये पूर्ण करण्यात आले. सप्टेंबर, २०२२मध्ये दुसरा गर्डर बसवण्यात आला. पश्चिम रेल्वेकडून काम पूर्ण करण्यात आले.

आता मुंबई महापालिकेकडून पुलाच्या दोन्ही बाजूंकडील कामांना गती दिली जात आहे. या पुलाच्या पश्चिमेकडील गणपतराव कदम मार्गाला एन. एम. जोशी मार्गाशी जोडणारा भाग मेअखेरीस पूर्ण करून रहदारीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. त्यानंतरचेही टप्पे पूर्ण करून संपूर्ण पूल येत्या जुलैपर्यंत रहदारीसाठी खुला होणार आहे.



हेही वाचा

शिवडी-न्हावा पूल प्रकल्प ९५ टक्के काम पूर्ण

कोस्टल रोड लगत सागरी संरक्षक भिंतीची उभारणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा