Advertisement

म्हाडा गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरण्याची सोय; ई-बिलिंग प्रणाली सुरू

म्हाडा गाळेधारकांना आॅनलाईन सेवाशुल्क भरण्यासाठी म्हडाने ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क भरता येणार आहे.

म्हाडा गाळेधारकांना ऑनलाईन सेवाशुल्क भरण्याची सोय; ई-बिलिंग प्रणाली सुरू
SHARES

म्हाडा गाळेधारकांना आॅनलाईन सेवाशुल्क भरण्यासाठी म्हडाने ई-बिलिंग संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवाशुल्क भरता येणार आहे. तसंच अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरीता देखील या प्रणाली अंतर्गत सेवाशुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.  

याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकारी सविता बोडके आदी उपस्थित होते.

यावेळी जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) म्हणाले, म्हाडाने २३ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेऊन सेवाशुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ केलं आहे. या पार्श्वभूमीवर सेवाशुल्क अदायगीकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरूवात म्हणजे म्हाडासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे. मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतींमधील सुमारे १ लाख ४६ हजार  गाळेधारकांना याचा फायदा होणार आहे.

अभय योजनेचा लाभ घ्या

शासनाच्या निर्णयानंतर मुंबई मंडळातर्फे सेवा शुल्काच्या वसुलीकरिता एप्रिल -२०२१ पासून अभय योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शासनाने सन १९९८ ते २०२१ पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करुन या काळातील मुद्दल ५ वर्षांत १० हफ्त्यांमध्ये  भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसंच एकरकमी सेवाशुल्क भरू इच्छिणाऱ्या गाळेधारकांना विशेष सवलत देखील देण्यात आली आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी या प्रसंगी केलं.

आॅनलाईन देयक

मंडळाने तयार केलेल्या ई – बिलिंग प्रणालीमुळे गाळेधारकांना स्पर्शविरहित पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लवकरच गाळेधारकांना सेवाशुल्काचं देयक त्यांच्या ई-मेल वर प्राप्त होणार आहे व देयकाबाबत एसएमएस वर संदेश देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गाळेधारकांच्या सेवाशुल्क देयकाविषयी कोणत्याही तक्रारींकरिता ई – बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापन निहाय मेलबॉक्स देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी या प्रसंगी दिली.

मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी  योगेश म्हसे यांनी सांगितलं की, ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्याकरीता गाळेधारकांना म्हाडाच्या https://mb.mhada.gov.in/billing या संकेतस्थळावर तसंच https://mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा- बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणीही बेघर होणार नाही- उद्धव ठाकरे

ई-बिलिंग प्रणालीचा वापर करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करावा:

१) म्हाडाच्या https://mb.mhada.gov.in/billing  या संकेतस्थळावर जावं. तसंच म्हाडाच्या https://mhada.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर देखील सिटीझन कॉर्नर या विंडोअंतर्गत ही सेवा उपलब्ध आहे.

२) संकेतस्थळावर लॉग इन केल्यानंतर म्हाडाचं बोधचिन्ह असलेलं पान उघडेल. ही सेवा वापरण्यासाठी  मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येकासाठी एक युनिक कन्झ्युमर क्रमांक (Unique Consumer Number) तयार करण्यात आला आहे. हा युनिक कन्झ्युमर  क्रमांक वापरुन संकेतस्थळावर लॉग इन करावं.

३)  कन्झ्युमर क्रमांक टाकल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचे पृष्ठ उघडेल. या पृष्ठाच्या उजव्या बाजूला वर तुमचं देयक डाऊनलोड करण्यासाठीची लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करताच देयक पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड होईल. त्यावर तुमच्या देयकाची संपूर्ण माहिती दिलेली असेल. त्यामध्ये मागील देयक, थकबाकी यांसारख्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील.

४) देयक अदा करणाऱ्याचं नाव, देयकाची रक्कम, मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी टाकला की ‘पे’ या बटनावर क्लिक करावं. त्यावर क्लिक करताच पेमेंट गेटवे ओपन होईल.

५) या सुविधेअंतर्गत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बॅंकींग, युपीआय तसेच अगदी गुगल पे वापरुन सुद्धा गाळेधारकांना देयक अदा करता येणार आहे. गाळेधारकांना हव्या त्या पध्दतीने हे पेमेंट करण्याची मुभा आहे.

६)  देयकाची रक्कम खात्यातून वळती झाल्यानंतर गाळे धारकांना लगेचच त्याची पोच मिळेल. प्रत्येक गाळेधारकाला आपल्या खात्याची संपूर्ण माहिती इथं कायम उपलब्ध राहणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा