गरीबांच्या तोंडाला म्हा़डाने पुसली पाने; अत्यल्प गटासाठी ४८० नव्हे तर केवळ ६३ घरं

गरीबांसाठीच लाॅटरीत सर्वाधिक घरं असतील असा म्हाडाचा नेहमी दावाही असतो. त्यानुसारच यंदाच्या २०१८ च्या लाॅटरीत अत्यल्प गटासाठी ४८० घरं असतील अशी घोषणा म्हाडानं केली होती. पण ही घोषणा पोकळच निघाली आहे.

SHARE

परवडणारी घर बांधत अत्यल्प गटातील अर्थात गरीबांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपली निर्मिती झाल्याचा दावा म्हाडाकडून सातत्यानं केला जातो. तर गरीबांसाठीच लाॅटरीत सर्वाधिक घरं असतील असा म्हाडाचा नेहमी दावाही असतो. त्यानुसारच यंदाच्या २०१८ च्या लाॅटरीत अत्यल्प गटासाठी ४८० घरं असतील अशी घोषणाही म्हाडानं केली होती. पण ही घोषणा पोकळच निघाली आहे. 


घोर निराशा 

१६ डिसेंबरला फुटणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ३ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अत्यल्प गटासाठी ४८० नव्हे तर केवळ ६३  घरं आहेत. त्यामुळे नक्कीच मुंबईसारख्या महागड्या शहरात म्हाडाच्या माध्यमातून हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांपासून लाॅटरीची प्रतिक्षा करणाऱ्या अत्यल्प गटाची घोर निराशा या लाॅटरीनं केली आहे.


अत्यल्प गटाकडूनच प्रतिसाद 

म्हाडाची, त्यातही मुंबई मंडळाची लाॅटरी म्हटलं की सर्वाधिक प्रतिसाद हा अत्यल्प गटाकडूनच मिळतो. हजारोंच्या संख्येने या गटाकडून अर्ज सादर होतात. कारण याच गटाला मुंबईत खऱ्या अर्थानं घराची गरज असते नि याच गटाला खासगी बिल्डरांकडून घर खरेदी करण्याचा स्वप्नही परवडणारं नसतं. त्यामुळं या गटातील इच्छुक लाॅटरीची प्रतिक्षा करत असतात. 


मागच्या लाॅटरीत ८ घरं 

तर म्हाडाकडूनही अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे निर्माण केली जावीत हेच म्हाडाचं मुख्य उद्दीष्ट असतं. पण गेल्या काही वर्षांपासून मुंबई मंडळाकडून याच उद्दिष्टाला हरताळ फासला जात असल्याचं चित्र आहे. कारण गेल्या तीन-चार वर्षांपासून अत्यल्प गटासाठी लाॅटरीत म्हणावी तितकी घरंच नसतात. २०१७ च्या लाॅटरीत तर हा गट जवळजवळ बाद होता. कारण या गटासाठी मागच्या लाॅटरीत केवळ ८ घरं होती.


यंदाही निराशा

हीच परिस्थिती यंदाही आहे. यंदाच्या लाॅटरीत अत्यल्प गटातील घरांचा आकडा ६३ पर्यंत नेला आहे खरा. पण म्हाडाच्या घोषणेनुसार यंदा ४८० घर अत्यल्प गटासाठी असतील असा मोठा दावा मुंबई मंडळ करत होते. त्यानुसार अॅण्टाॅप हिल वडाळा इथं २७८, सायन प्रतिक्षानगर इथं ८३, सायन प्रतिक्षानगर (आरआर) ५ आणि पीएमजी मानखुर्द ११४ अशी ही ४८० घर असतील असं मुंबई मंडळाकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळं गरीब, अत्यल्प गटातील इच्छुकांना यंदा मोठा दिलासा मिळाला होता नि हे इच्छुक लाॅटरीच्या जाहिरातीची प्रतिक्षा करत होते.


घरं वळवली

शनिवारी लाॅटरीची घोषणा झाली नि अत्यल्प गटातील इच्छुकांच्या पदरी आता घोर निराशाच पडणार हे स्पष्ट झालं. कारण ४८० एेवजी केवळ ६३ घर यंदा लाॅटरीत आहेत. तर या घरांच्या किंमती २० लाखांपर्यंत आहेत. अत्यल्प गटातील घर मुंबई मंडळानं मोठ्या हुशारीनं अल्प गटात वळवली आहेत. अल्प गटासाठी जिथं २९३ घरं असायला हवी होती तिथं या गटातील घरांचा आकडा थेट ९२६ वर गेला आहे. 

याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्याकडे मुंबई लाइव्हनं विचारणा केली असता, मागच्या वर्षी केवळ ८ घरं होती तिथं यंदा ६३ घरं असून हा आकडा मोठा असल्याचं म्हटलं आहे. तर अल्प गटालाही मोठ्या संख्येनं घराची गरज असते. त्यामुळं या गटासाठी अधिकाधिक घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा - 

अबब! म्हाडाचं ग्रँट रोडमधील घर ५ कोटी ८० लाखाला

म्हाडाचा दिवाळी धमाका; १६ डिसेंबरला फुटणार १३८४ घरांसाठी लॉटरी
संबंधित विषय
ताज्या बातम्या