बीकेसीतील तिन्ही पार्किंगचे शटर अखेर डाऊन

 Mumbai
बीकेसीतील तिन्ही पार्किंगचे शटर अखेर डाऊन

मुंबई- बीकेसी, जी ब्लॉकमधील एमएमआरडीएच्या तिन्ही पार्किंगचे शटर अखेर गुरूवारी सकाळी एमएमआरडीएने डाऊन केले. गुरूवारी सकाळपासूनच सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करत एकाही दुचाकी, चारचाकीला पार्किंगमध्ये घुसू दिले नाही. तर त्वरित पार्किंगच्या बाजूला पत्र्यांचे कुंपन लावण्यात आले आहे. गाड्या पार्किंगसाठी जागाच नसल्याने सकाळी कामाच्यानिमित्ताने येथे येणाऱ्यांचा गोंधळ उडाला. अनेकांनी दूर अमेरिकन दुतावास आणि युटीआय बँकेजवळ गाड्या पार्क केल्या. ज्यांना काहीच पर्याय नव्हता, त्यांनी चक्क गाड्या रस्त्यावरच पार्क केल्या. त्यामुळे पार्किंगच्या बाहेर दुचाकींच्या रांगाच रांगा होत्या. पण त्याचवेळी वाहतूक पोलीस गाड्या नेणार तर नाहीत ना हीच भिती त्यांच्या मनात होती.

पार्किंगचे कंत्राट संपल्याने नवीन कंत्राटदार येईपर्यंत पार्किंग बंद करण्यात आले आहे. पण वारंवार निविदा काढूनही कंत्राटदार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यापुढेही या पार्किंग सुरू होतील का? याबाबत साशंकताच आहे. दरम्यान बीकेसी हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिंक केंद्र असून, येथे दररोज लाखोंच्या संख्येने लोक कामासाठी येतात. अशावेळी पार्किंग बंद झाल्याने गोंधळ उडाला असून पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त ‘मुंबई लाईव्ह’ने गुरूवारी प्रसिद्ध केले होते.

दरम्यान पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देणे ही एमएमआरडीएची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे कंत्राटदार नाही म्हणून पार्किंग बंद करणे योग्य नसल्याचे म्हणत बीकेसी पार्किंग इश्यू ग्रुने याचा निषेध केला आहे. तर रिलायन्स जियोच्या पार्किंगला चालना देण्यासाठीच एमएमआरडीएने हा घाट घातल्याच्या आरोपाचा पुनरूच्चारही त्यांनी केला आहे. दरम्यान गुरूवारी या ग्रुपने एमएमआरडीएत धाव घेत आपली व्यथा मांडली मात्र वरिष्ठ नसल्याचे म्हणत एमएमआरडीएने ग्रुपला आल्या पावली परत पाठवले.

Loading Comments