Advertisement

राजकीय पक्षांचा कारभार आता ठाकरसी हाऊसमधून


राजकीय पक्षांचा कारभार आता ठाकरसी हाऊसमधून
SHARES

मेट्रो-3 प्रकल्पाच्या कामासाठी नरिमन पॉइंट येथील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह अन्य पक्षांच्या कार्यालयाची जागा संपादित करण्यातील अडथळा अखेर दूर झाला आहे. आतापर्यंत कार्यालय स्थलांतरीत करण्यास नकार देणाऱ्या पक्षांनी अखेर आता कार्यालये स्थलांतरीत करण्यास होकार दिल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)चे कार्यकारी संचालक (नियोजन) आर. रमण्णा यांनी दिली आहे. त्यानुसार पुढच्या पाच वर्षांसाठी या पक्षांचा कारभार मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ठाकरसी हाऊसमधून चालणार आहे. मात्र शिवसेनेने ठाकरसी हाऊसमध्ये स्थलांतरीत होण्यास नकार देत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या बंगल्यात कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने यास परवानगी दिल्याने शिवसेनेचे कार्यालय वायकरांच्या कार्यालयात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचेही रमण्णा यांनी सांगितले आहे. दरम्यान, पक्ष कार्यालये स्थलांतरीत करण्यास नकार देणाऱ्या पक्ष कार्यालयांची वीज कापल्याबरोबर पक्ष कार्यालयांनी स्थलांतरीत होण्यास होकार दर्शवला आहे.

मेट्रो-3 साठी नरिमन पाइंट येथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप बहुजन महासंघ, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पक्ष आदी पक्षांची कार्यालये तात्पुरती विस्थापित केली जाणार आहेत. ही कार्यालये स्थलांतरीत करण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया एमएमआरसीने पूर्ण केली असून मेट्रो-3 च्या कामाला सुरुवातही झाली आहे. असे असताना वारंवार नोटीस पाठवूनही कार्यालये स्थलांतरीत होत नसल्याने कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता.

[हे पण वाचा - मेट्रो-3 ने केली राजकीय पक्षांच्या कार्यालयांची बत्तीगुल]

 त्यामुळे 23 मार्च रोजी एमएमआरसीने आक्रमक धोरण स्वीकारत 4 एप्रिलपर्यंत कार्यालये स्थलांतरीत करण्याची नोटीस कार्यालयांना बजावली होती. या नोटिशीनुसार स्थलांतरीत न झाल्यास कडक कारवाईचे संकेतही दिले होते. त्यानुसार एमएमआरसीने 23 एप्रिलला कार्यालयांची वीज कापत पक्षांना दणका दिला. अंधारात गेल्यानंतर अखेर सर्व कार्यालयांनी स्थलांतराचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच काँग्रेसचे कार्यालय ठाकरसी हाऊसमध्ये स्थलांतरीत होईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

[हे पण वाचा - मेट्रोमुळे राजकीय पक्षांची कार्यालयं स्थलांतरित होणार]

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारच्या आणि एमएमआरसीच्या या धोरणाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सत्तेत असणारे काहीही निर्णय घेऊ शकतात, त्यांना कोण रोखणार? अशा शब्दांत नवाब मलिक यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ठाकरसी हाऊसमध्ये अंदाजे 18 हजार चौ. फुटाची जागा या पक्षांना देण्यात आली असून इंटिरिअरसह सज्ज अशी ही कार्यालये असल्याचे रमण्णा यांनी सांगितले आहे. पुढची पाच वर्षे या कार्यालयांचा मुक्काम ठाकरसी हाऊसमध्ये असणार आहे. पुढे सरकारच्या निर्देशानुसार कायमस्वरूपी पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही रमण्णा यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा