Advertisement

मेट्रो-3 ने केली राजकीय पक्षांच्या कार्यालयांची बत्तीगुल


मेट्रो-3 ने केली राजकीय पक्षांच्या कार्यालयांची बत्तीगुल
SHARES

नरीमन पाँईट येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षाच्या कार्यालयांची रविवारी रात्री उशीरा बत्ती गुल झाली. अचानक सर्व कार्यालये अंधारात गेली आणि सर्वांची पंचाईत झाली. याला कारण होते  मेट्रो-3. या प्रकल्पात विस्थापित होणारी पक्ष कार्यालये नोटीसांवर नोटीसा देऊनही स्थलांतरीत होत नसल्याने अखेर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने रविवारी रात्री उशीरा या कार्यालयांची वीज कापली. एमएमआरसीच्या या कारभारावर सर्वच पक्षांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, सोमवारी सर्व पक्षांचे नेते एमएमआरसी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मेट्रो-3 प्रकल्पात नरीमन पाँईंट परिसरातील राजकीय पक्षांची कार्यालये विस्थापित होणार असून, त्यांचे तात्पुरते पुनर्वसन इतरत्र करण्यात आले आहे. त्यानुसार या पक्ष कार्यालयांना नियोजित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी नोटिसा बजावल्यानंतरही पक्ष कार्यालये स्थलांतरीत होत नसल्याने एमएमआरसीची डोकेदुखी वाढली होती. तसेच प्रकल्पाचे कामही रखडले होते. त्यामुळे एमएमआरसीने कडक भूमिका घेत सर्व पक्ष कार्यालयांना इशारा दिला होता. त्यानुसार 23 मार्चला नव्याने नोटिसा पाठवत 3 एप्रिलपर्यंत कार्यालये रिकामी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही कार्यालये रिकामी न केल्याने 23 एप्रिलला , रविवारी उशीरा एमएमआरसीने वीज कापली आहे. दरम्यान बेस्टकडून वीज कापण्यासंबंधीची कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे बेस्टच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

कार्यालये स्थलांतरीत करण्यासंबंधीची चर्चा एमएमआरसीशी सुरू होती. आम्ही स्थलांतरीत होण्यासाठी होकारही दर्शवला होता. सामान कसे कधी हलवायचे याविषयीही सोमवारी 24 एप्रिलला अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरले होते. असे असताना एमएमआरसीने अचानक वीज कापणे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आजच आम्ही अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली असून, असे चूकून झाल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पण असे चुकून कसे होऊ शकते, असा सवाल करत नवाब मलिक यांनीही आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचे स्ष्ट केले आहे.

ही जागा मेट्रो-3 साठी एमएमआरसीकडे हस्तांतरीत झाली आहे. सर्व पक्ष कार्यालयांना नोटीसाही पाठवल्या आहेत. पण ही कार्यालये स्थलांतरीत होत नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एमएमआरसीच्या प्रवक्त्याने दिली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा