Advertisement

मेट्रो-2 बी विरोधात उपनगरातील रहिवाशांचा एल्गार


मेट्रो-2 बी विरोधात उपनगरातील रहिवाशांचा एल्गार
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-3 मार्गाला वादाचं ग्रहण लागलेलं असतानाच आता डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रो-2 ब मार्गही विरोधात अडकत चालला आहे. जेव्हीपीडी ते वांद्रेदरम्यान राहणाऱ्या रहिवाशांनी उन्नत (एलिव्हेटेड) मेट्रोला विरोध केला आहे. उपनगरात उन्नत मेट्रो मार्गाएवजी भुयारी मेट्रो मार्ग बांधावा, अशी या रहिवाशांची मागणी आहे. मात्र या मागणीकडं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए) कानाडोळा करत आहे. त्यामुळं या रहिवाशांनी जनआंदोलनाची हाक दिली असून 22 सप्टेंबरला 'भारत जोडो' नावानं हे रहिवासी जेव्हीपीडी ते खार असा भव्य शांतता मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती एस. व्ही. रोड येथील रहिवासी झाफर झवेरी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

रविवारी मेट्रो-2 ब च्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जेव्हीपीडी येथे एक सार्वजनिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत 22 सप्टेंबरला शांतता मोर्चा काढण्याचं एकमतानं ठरवण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


सप्टेंबरअखेरीस दोन याचिका 

रहिवाशांच्या मागणीला डावलून एमएमआरडीए मेट्रो-2 ब च्या कामाला वेग देत आहे. त्यामुळं जेव्हीपीडी आणि खारमधील रहिवाशांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भुयारी मेट्रो मार्गाच्या मागणीसाठी दोन वेगवेगळ्या याचिका सप्टेंबर अखेरीस उच्च न्यायालयात दाखल केल्या जातील, असंही झवेरी यांनी स्पष्ट केलं.

मेट्रो-2 ब एस. व्ही. रोडसह जेव्हीपीडी, अंधेरी परिसरातून जाणार आहे. या परिसरात मेट्रोच्या मार्गालगत मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय, रूग्णालय आणि चर्च आहेत. मेट्रोच्या पिलरमुळं आधीच छोटा असलेला येथील रस्ता आणखी अरूंद होऊन रहिवाशांच्या अडचणी वाढतील, असं रहिवाशांचं म्हणणं आहे. त्यामुळं येथे उन्नत मेट्रोऐवजी भुयारी मेट्रो बांधावी, असं म्हणत जेव्हीपीडी, खार, सांताक्रूझ आणि वांद्र्यातील सर्व रहिवासी संघटना 'मुंबई जोडो' नावानं एका छताखाली आल्या आहेत.

मेट्रोसारखा पायभूत सुविधा प्रकल्प राबवताना भविष्याचा विचार करून त्यांची बांधणी व्हायला हवी, पण या प्रकल्पात तसं होत नसल्यानं जनतेच्या पैशांचा अपव्यय सुरू असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. भविष्यात गरज पडल्यास उन्नत मार्गाचं विस्तारीकरण करता येणार नाही, असं प्रसिद्ध वास्तुविशारद पी. के. दास यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळंच रहिवाशांचा भुयारी मार्गावर भर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


सेलिब्रिटीही रस्त्यावर 

नुकत्याच झालेल्या रहिवाशांच्या बैठकीत अभिनेत्री रविना टंडनने सहभागी होत भुयारी मेट्रोची मागणी केली. रविना सोशल मीडियातूनही जनजागृती करताना दिसत आहे. त्याचसोबत चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडीतही 'मुंबई जोडो' चळवळीत आघाडीवर आहेत. प्रसिद्ध वास्तुविशारद नितीन किलावाला आणि पी. के. दास यांनीही 'एमएमआरडीए'विरोधात दंड थोपटत भुयारी मेट्रोची मागणी उचलून धरत रहिवाशांना पाठिंबा दर्शवला आहे.


दक्षिण मुंबईत भुयारी मेट्रो शक्य आहे, तर उपनगरात का नाही ? 'एमएमआरडीए'कडून देण्यात येणारी पैसा आणि वेळ ही कारणे खोटी आहेत. उन्नत मेट्रो मार्गामुळे एस. व्ही. रोडवरील अडचणी भविष्यात वाढणार असल्याने आमची भुयारी मेट्रोची मागणी आहे. पण ही मागणी मान्य होत नसल्याने आता आम्ही जनआंदोलन तीव्र करण्यासोबत न्यायालयीन लढाई लढणार आहोत.

-झाफर झवेरी, रहिवासी, एस. व्ही. रोड


वांद्र्यावरून अंधेरीला जाणारा एस. व्ही. रोड महत्त्वाचा रस्ता असून हा 90 फुटांचा आहे. या रस्त्यावर नियमित वाहतूककोंडी असते. असे असताना मेट्रो-2 ब च्या रुपाने हा रस्ता 30 टक्क्यांनी कमी होणार आहे. त्यामुळे येथील अडचणी वाढणार आहे.

- पी. के. दास, प्रसिद्ध वास्तुविशारद


पंतप्रधानांना 10 हजार पत्र

मुख्यमंत्र्यांकडं आमच्यासाठी वेळ नसल्यानं आम्ही थेट पंतप्रधानांनाच साकडं घातलं आहे. सरकार आमच्या मागणीकडं लक्ष देत नसल्यानं आता पंतप्रधानांनीच लक्ष द्यावं आणि उपनगरात भुयारी मेट्रो बांधण्याचे निर्देश द्यावेत, अशा स्वरूपाचे पत्र पंतप्रधानांना लिहिली जात आहेत. त्यानुसार 10 हजार पत्र त्यांना पाठवण्याचा आमचा विचार आहे, असं खार रेसिडेन्ट असोसिएशनच्या अध्यक्ष आनंदिनी ठाकूर यांनी सांगितलं. 



भुयारी मेट्रो मार्गाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पत्राद्वारे कित्येकदा वेळ मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांना जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. 22 सप्टेंबरला होणाऱ्या शांतता मोर्चात मोठ्या संख्येने मुंबईकर सहभागी होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

-आनंदिनी ठाकूर, अध्यक्ष, खार रेसिडेन्ट असोसिएशन




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा