अवैध 'मैत्री' प्रकरणी नवा खुलासा

  Santacruz
  अवैध 'मैत्री' प्रकरणी नवा खुलासा
  मुंबई  -  

  म्हाडा आणि सनदी अधिकाऱ्यांच्या अवैध 'मैत्री'चा नुकताच माहिती अधिकाराखाली पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच आता याप्रकरणी आणखी एक बाब समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम केलेले असताना आणि या बांधकामास परवानगी मिळालेली नसतानाही म्हाडाने मात्र कंत्राटदार बी. जी. शिर्केला बांधकामाची 94 टक्के रक्कम अदा केली आहे. माहिती अधिकाराखाली ही बाब समोर आली असून कंत्राटदाराला खर्चाची रक्कम अदा करण्याची म्हाडाला इतकी घाई का? असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

  या बांधकामासाठी 31 मार्च 2017 पर्यंत 20 कोटी 14 लाख 78 रुपये इतका खर्च आला आहे. त्यानुसार म्हाडाने यापैकी 94 टक्के अर्थात 18 कोटी 83 लाख 80 रुपयांची रक्कम अदा केली आहे. कंत्राटदार रक्कम घेऊन मोकळा झाल्याने यापुढे याप्रकरणी तो दोषी सिद्ध झाल्यास कंत्राटदाराकडून ही रक्कम कशी वसूल करणार?

  - अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते

  कलिना, कोळे कल्याण येथे सनदी अधिकाऱ्यांसाठी 'मैत्री' नावाने टॉवर बांधण्याचे काम म्हाडाकडून सुरू आहे. या बांधकामांतर्गत म्हाडाला 'ए' विंगसाठी 3 माळ्यापर्यंतची आणि 'बी' तसेच 'सी' विंग साठी 2 माळ्यांपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. असे असताना म्हाडा आणि कंत्राटदाराने प्रत्येक विंगमध्ये 12 माळ्यांचे असे एकूण 29 माळ्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती माहिती अधिकाराखाली अनिल गलगली यांनी उघड केली आहे. तर हे अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी म्हाडाक़डून रीतसर प्रस्तावही पाठवण्यात आल्याचे माहिती अधिकाराखाली समोर आले आहे. त्यामुळे या अवैध मैत्री घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसह अनधिकृत मजले पाडण्याचीही मागणी गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.