Advertisement

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दिवाळीत होण्याची शक्यता

शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेला दिवाळीला गिफ्ट देण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दिवाळीत होण्याची शक्यता
SHARES

शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) राज्यातील जनतेला दिवाळीला गिफ्ट देण्याची शक्यता आहे. नागपूर - मुंबई असा 701 किलोमीटर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

येत्या दिवाळीला एक दिवस अगोदर म्हणजे येत्या 23 ऑक्टोबर रोजी हा लोकार्पण सोहळा नागपुरात होण्याची शक्यता आहे.पण पाऊस आणि अन्य कारणांमुळे लोकार्पण पुढे ही ढकलण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जातं आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरु करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. परंतु नेहमी लोकार्पणाच्या कामात अडचणी आल्या आहेत.

अनेकदा कामाचा दर्जा, काम सुरु असताना झालेल्या दुर्घटना यांमुळे समद्धी महामार्गाचं उद्घाटन कायम पुढे पडत गेलं. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी अजूनही हा महामार्ग खुला करण्यात आलेला नाही.

एकूण 16 टप्प्यांत या महामार्गाचं बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या 701 किलोमीटरच्या महमार्गात एकूण 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामं असून यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणचं काम अद्याप शिल्लक आहे.

मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे.

नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या 'समृद्धी महामार्गाची' घोषणा विधानसभेत केली होती.

प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिसूचनेत वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे.



हेही वाचा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 मध्ये कार्यान्वित होईल : देवेंद्र फडणवीस

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा