रखडलेल्या झोपु प्रकल्पांना एसपीपीएल आणि एसबीआयचा मदतीचा हात


SHARE

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्यास सुरूवात केली खरी. पण आजही अनेक झोपु प्रकल्प कोणत्या ना कोणत्या कारणांनी रखडले आहेत. त्यातही केवळ आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या प्रकल्पांची संख्या मोठी आहे. हे प्रकल्प रखडल्याने हजारो झोपडपट्टीवासियांचे चांगल्या हक्काच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे.

आता मात्र लवकरच आर्थिक कारणांमुळे रखडलेले झोपु प्रकल्प मार्गी लागत झोपडपट्टीवासियांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण, आता अशा प्रकल्पांना शिवशाही पुनर्विकास प्रकल्प मर्यादित (एसपीपीएल) आणि स्टेट बँक आँफ इंडिया (एसबीआय) मदतीचा हात देणार आहे. जेणेकरुन रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी मिळेल.

आर्थिक कारणांमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय याआधीच एसपीपीएलने घेतला आहे. 2022 पर्यंत 22 लाख परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यानुसार ही घरे बांधण्याची जबाबदारी म्हाडा, एसआरएसह एसपीपीएलवरही टाकली आहे. मात्र एसपीपीएलकडे घरे बांधण्यासाठी जमीनच नसल्याने अखेर त्यांनी रखडलेल्या झोपु मार्गी लावत त्यातून परवडणारी घरे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.


करार झाला

रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एसपीपीएलला एसआरएकडून 500 कोटींची मदत मिळाली आहे. मात्र या निधीत हे प्रकल्प मार्गी लावणे शक्य नसल्याने एसपीपीएलने एसबीआयची मदत घेत बिल्डरांना मदत करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार, मंगळवारी एसपीपीएल आणि एसबीआयमध्ये यासंबंधीचा सामंजस्य करार झाला. गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत हा करार झाला. आता रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागतील आणि परवडणारी घरेही तयार होतील, अशा विश्वास मेहता यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

करारानुसार रखडलेल्या प्रकल्पातील पुनर्वसनाच्या भागाला एसपीपीएल आर्थिक मदत करणार आहे. तर विक्रीसाठीच्या इमारतीला एसबीआय निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी मेहता यांनी स्पष्ट केले आहे.हेही वाचा

झोपुवासियांना ३२२ चौ. फुटांचे घर?


संबंधित विषय