मुंबई – दररोज तयार होणाऱ्या दहा हजार मॅट्रीक टन कचरा सामावून घेण्यास मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार डंपिंग ग्राऊंड अपुरे पडत आहेत. त्यामुळे कचऱ्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार कांजुरमार्ग येथे पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पालिकेनं आपला मोर्चा देवनार डम्पिंग ग्राऊंडकडे वळवला आहे. देवनारवर दररोज सरासरी तीन हजार मॅट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा वीजनिर्मिती प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार आहे. या मुळे येथील आगीचा प्रश्न सुटण्याबरोबरच नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकल्पासाठी ऑक्टोबरमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा अंतिम करत जानेवारी 2017 मध्ये या प्रकल्पावर काम सुरू होण्याची शक्यता आहे. तर या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.