Advertisement

नजरेनेही होतो बलात्कार !


नजरेनेही होतो बलात्कार !
SHARES

मस्त आहेत तुझे...अशी अश्लील कमेंट करत एक माणूस शीतलला नकोसा स्पर्श करून गेला. शीतलच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती त्या माणसाच्या मागे गेली आणि त्याला अडवलं. काय बोललास रे? जरा जोरात बोल. काय मस्त आहेत माझे? तो थोडा घाबरला. लोकं पण बघायला लागली. अरे बोल ना काय मस्त आहेत माझे? लाज वाटतेय का जोरात बोलायला? कानात हळूच बोलून जाताना लाज नाही वाटत? त्याला स्तन म्हणतात. तुझ्या आई आणि बहिणीकडेही आहेत. त्यांना पण असंच बोलतोस का? शीतलचा संताप आणि आक्रोश पाहून त्याची बोबडीच वळली. आणखी लोकं जमायला लागल्याचं पाहून त्याने तिथून पळच काढला. शीतलला आलेला अनुभव अनेक स्त्रियांना आला असेल. स्त्रियांसाठी हे काही नवीन नाही. लोकल, बस आणि इतर गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना भोवतालच्या चोरट्या नजरा, किळसवाणे स्पर्श, घाणेरड्या कमेंट्स आणि अश्लील हावभाव यासारखे प्रकार स्त्रियांना नेहमीच झेलावे लागतात.


शी...किळस वाटते अशा लोकांची. कितीही अंग झाका, पण ही मेली गिधाडं टपलेलीच असतात. कधी व्यासनाधीन नजरेने छातीकडे बघतात तर कधी दुसरीकडे, नाहीतर गर्दीच्या नावाखाली धक्के मारतात किंवा स्पर्श करुन जातात. असं वाटतं की या व्यासनाधीन नजरेने पाहणाऱ्या आंबट शौकिनांचे डोळे फोडावेत. स्पर्ष करणारे हात तोडावेत. रोज त्याच त्याच घाणेरड्या नजरा. जिथे जा तिथे या नजरा पिच्छा करत असतात. अगदी वडिलांच्या किंवा आजोबांच्या वयाचे पुरुषही अंगाला स्पर्श करून जातात.

घरातून बाहेर पडलं की, गल्ली किंवा कुणा एका टपरीवरील गँग घाणेरड्या कमेंट करणार..शिट्या वाजवणार...बसमध्ये गर्दीच्या नावाखाली हपापले पुरुष स्पर्श करणार...रस्त्यावरून चालताना त्या व्यासनाधीन नजरा चुकवायच्या. समोर असलेली स्त्री जणू काही नग्नच उभी आहे की काय? आजही मला आठवतंय, एकदा पावसात भिजले होते. त्यामुळे कपडे अंगाला चिकटले होते. पण रस्त्यावरच्या प्रत्येक पुरुषाच्या नजरा माझ्यावर. ज्या हपापलेल्या नजरेनं ते माझ्याकडे पाहत होते, आजही आठवलं की काटा येतो अंगावर. टोचटात त्या नजरा आजही. 

खरंतर अशा घटनांना विरोध करायला अनेक स्त्रिया घाबरतात. उगाच इश्यू नको बाबा, असं म्हणत गप्प सहन करतात. तर काही या सर्व गोष्टी खूप लाइटली घेतात. अरे ठिक है ना... भीडमें ऐसा होता है... चलता है ना? औरतो को एटजेस्ट करना चाहिये, असं म्हणणाऱ्या स्त्रियाही आहेतच. सर्वात धक्कादायक म्हणजे काही पालकही आपल्या मुलींना अशा घटनांचा विरोध करण्याऐवजी दुर्लक्ष करण्याचा सल्ला देतात. पण त्यामुळेच अशा पिसाळलेल्या कुत्र्यांची हिम्मत वाढते. वेस्टर्न कपडे घातले किंवा अंगप्रदर्शन केले की अशा घटना होणारच ना? असाही काहींचा समज असतो. अशा लोकांची कीव करावी तेवढी कमीच. पण या सर्वात पुरुषी मानसिकतेचं काय? असे चाळे करणाऱ्यांच्या पुरुषी मानसिकतेवर का कुणी बोलत नाही? स्त्रियांचे तोकडे कपडे दिसतात. पण अशा घाणेरड्या मानसिकतेचं काय? आता याचाही विचार कराच...

यासंदर्भात जेव्हा इतर महिलांचे अनुभव ऐकले तेव्हा धक्काच बसला...

"आजकाल गर्दीच्या ठिकाणी अथवा सुनसान रस्त्यावर मुलींना, महिलांना एकटे गाठून त्रास देणाऱ्या रोड रोमिओंची किंवा त्यांच्यावर पाशवी अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या माणसांची समाजात कमी नाही हे टीव्ही, पेपरमधल्या बातम्या पाहिल्या की लक्षात येतं. लाडाकोडात वाढवलेल्या आपल्या लेकी सुनांना अशा भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागू नये म्हणून आपला समाज काय करतो? मुलींनो हेच कपडे घाला, हे घालू नका, इकडे जाऊ नका, इतक्याच वेळात घरी परत या, रात्री, उशीरा घराबाहेर पडू नका, याच्याशी बोलू नका, त्याच्याकडे बघू नका, असे वागू नका, तसे करु नका अशी बंधने आणतो. म्हणजे संस्कारांच्या गोंडस नावाखाली बऱ्याचदा त्यांची मानसिक कोंडी करत असतो. मुलींनाच सरळमार्गी बनण्याचे धडे देत असतो. ते एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण त्याचा अतिरेक होत नाही ना? हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. कारण सरळसोट चालून देखील मुलींना पुरुषांच्या टारगटपणाचा सामना करावा लागतोच. मग सल्ला येतो आत्मसंरक्षण करा. मार्शल आर्ट शिका. त्रास देणाऱ्यासोबत दोन हात करा. सगळं काही शिकवायचं ते मुलींना. सज्जन व्हायचं ते मुलींनीच? असं का? महिलांना वासनांध नजरेने बघणाऱ्या, त्यांना भोगवस्तू समजणाऱ्या नि मनाला येईल तसं त्यांना वागवणाऱ्या मुलांना, पुरुषांना कोणी काहीच शिकवणार नाही? त्यांची महिलांविषयी जाणीव, नजर निकोप करण्याची आणि त्यांच्यावर संस्कार करायची खरी गरज आहे.
'जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी' अशी शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती आहे. प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्रीबाबत प्रतिष्ठा आणि आदरभाव निर्माण होईल, असे बाळकडू लहानपणापासून पाजले गेले तर स्त्रीकडे पाहून हीन भावना जागृत होणार नाहीत."

- शैलजा गांगण

"ए आयटम, काय माल आहे, लै भारी यासारख्या अनेक कंमेन्ट्स रोजच्या धावपळीत कानावर पडत असतात. मग ती गर्दीची ठिकाणं असो की मोकळे रस्ते. या अश्लील कमेन्टमधून टवाळखोरांना काय सुख मिळतं त्यांनाच माहीत. पण तरुण मुलांपेक्षा जेव्हा वडीलसमान पुरुष अंगाला घाणरेडा स्पर्श करुन जातो तेव्हा जास्त चीड येते. एकदा मी ऑफिसवरून घरी जाण्यासाठी बस पकडली. साकीनाकावरून घाटकोपरला जाणारी बस असल्यानं खचाखच भरली होती. मी आणि माझी मैत्रिणी कसेबसे बसमध्ये शिरलो. माझ्या मागे वडिलांच्या वयाचा पुरुष होता. जो मुद्दाम अंगावर पडून पार्श्वभागाला हात लावत होता. मी त्याला ओरडले तर तो गर्दीचं कारण सांगत माझ्यावरच खेकसला. शेवटी मीच पुढे जागा करुन गेले. समोरुन येणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या चालीवरून महिलेला कदाचित आपली चाल बदलावी लागत असेल. काही महिला लाजेखातर काहीच बोलत नाहीत. मात्र आपण त्यांना तिथल्या तिथेच रोखलं पाहिजे."

- प्रार्थना साटम-यादव

"अशा घटना रोजच कोणा ना कोणासोबत घडत असतात. याला कोणतीही मुलगी अपवाद नाही, हेच सत्य. मी एक पत्रकार असूनही अशा घटना माझ्यासोबत घडल्या. अगदी ऑफिसमध्येही असे अनुभव आले. एका वर्तमानपत्रात काम करताना सहयोगी नेहमी छातीकडे पहात बोलायचा. सुरुवातीला लाज वाटली. त्याच्या पुढ्यात उभं राहू नये असं वाटायचं. त्याला टाळायला लागले. पण असं किती दिवस? अखेर एक दिवशी त्याला विचारलं - काय पाहताय? घरी बायकोने कधी दाखवलं नाही का? आता लाज वाटायची वेळ त्याची होती. पुन्हा कधी त्याची नजर डोळ्यांखाली गेलीच नाही.
रस्त्याने जाताना आपण पुरुषांना नेहमीच घाबरत चालतो. धक्का लागू नये म्हणून काळजी घेतो. पण, पुरुषांना इतका माज असतो की, लहान मुलींनाही सोडत नाहीत. माझी बहीण दादरला शाळेत जायची. एकदा तिला शाळेत सोडण्यासाठी मी गेले. स्टेशनवरच्या ब्रिजवर बरीच गर्दी झाली. तिला मी असं चाल-तसं चाल सांगत होते. तरी एका म्हाताऱ्याने तिला मुद्दाम धक्का मारला. ती कळवळली, रडू लागली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी मागे वळली. त्या गर्दीत त्या म्हाताऱ्याला शोधलं आणि सनकावून कानशिलात लगावली. हातातली बॅग त्याच्यावर भिरकावून मारली. तोच त्याला त्या गर्दीने चोपायला सुरुवात केली आणि मी ठरवलं, यापुढे मुलींना कसं चालायचं हे शिकवायचं नाही, तर कसं मारायचं हे शिकवायचं."

- प्राजक्ता करगुटकर

"मी आणि माझी मैत्रिण क्लासवरून घरी जात होतो. १२वीत असू आम्ही तेव्हा. रोज एक माणूस कल्याण स्टेशनला २-३ दिवस आमच्या बाजूला उभा राहायचा आणि पॉर्न व्हिडिओ मुद्दाम आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तो अशा पद्धतीने आम्हाला ते व्हिडिओ दाखवायचा की व्हिडिओ फक्त आम्हाला दिसायचा. त्याचं हे वागणं २-३ दिवस सुरु होतं. शेवटी आम्ही दुसरीकडे उभं रहायला लागलो. पण एक दिवस तो माणूस आमचा पाठलाग करत क्लासपर्यंत आला. घरी जातानाही तो माणूस पाठलाग करत होता. आम्ही खूप घाबरलो. पण मीच पुढाकार घेऊन लोकांना आवाज जाईल इतक्या जोरात त्याला ओरडले. त्यानंतर दोन दिवसांनी तो माणूस आम्हाला दिसला पण आमच्यापासून लांबच उभा होता. अशा माणसांकडे दुर्लक्ष न करता त्यांना वेळीत हटकलेलं चांगलं असतं."

- शर्वरी जोशी

"१० वर्ष झाली मुंबईत येऊन. सुरुवातीपासूनच ट्रेनचा प्रवास. गिरगावातून सकाळी ७च्या शिफ्टसाठी नवी मुंबई गाठताना आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं होतं की आपण मुलगी आहोत आणि आपल्याकडे पाहायच्या लोकांच्या नजरा खूप वेगळ्या आहेत. सर्वात पहिला अनुभव म्हणजे त्या दिवशी सकाळी खूप लवकर निघायचं होतं. त्यामुळे सकाळी लवकर ट्रेन पकडली मी. आणि एक मैत्रीण दुसऱ्या स्टेशनवरुन चढली. ट्रेन सुरू झाल्यावर काही टपोरी मुलंही चढली आणि आम्हाला घाणेरड्या पद्धतीने त्रास देऊ लागले. आमची पर्स घेऊ लागले. आम्ही आमच्या परीने त्यांच्यापासून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात अचानक काही झोपलेल्या बायका उठल्या. मुलांना मारलं आणि दुसऱ्या स्टेशनवर पोलिसांकडे दिलं. पुढे असे अनुभव येतच गेले. पण आता मी खंबीर झाले होते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला वाचवायला कोणी येणार नव्हतं. मुलींनी नेहमी कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करत रडत बसण्यापेक्षा जरा खंबीर होऊन लढायला शिकलं पाहिजे."

- तृप्ती गावंड

"असं खूप वेळा होतं की, तुम्ही ऑफिसला किंवा बाहेर जाताना खूप घाईत असता आणि तुमच्या नकळत कोणी तरी तुम्हाला हात लावून किंवा चिमटा काढून जातो. क्षणभर तुम्हाला काहीच कळत नाही आणि तुम्ही त्याच ठिकाणी स्तब्ध उभे रहाता. अशा वेळी आक्रोश करावं, ओरडावं की गप्प शरमेने मान खाली घालून निघून जावे. खूप गोष्टी घडल्या आहेत आणि आजही घडत आहेत. कोणी कमरेला हात लावून जातं तर कोणी मागे किंवा पुढे झोरात हात मारुन जातात. तर कोणी छातीवर मारुन किंवा दाबून जातात. नको वाटतो तो भाग, जिथे कोणीतरी स्पर्श करुन जातो. का सहन करावा हा त्रास? का करावा स्वतःचा त्रागा? फक्त स्त्री आहोत म्हणून? विचार करा...बघा मिळते का उत्तर..."

- चित्रांगी मुणगेकर

"पुरुषी मानसिकता अजून बदललेली नाही. त्यांच्या नजरेत स्त्री शारीरिक उपभोगाची वस्तू आहे. हे मी अनुभवलं आहे. प्लॅटफॉर्मवर उभे होते. समोर असलेल्या जेन्ट्स डब्यातून तरुण अश्लील हावभाव करत असतात. वडिलधारे पुरुषसुद्धा विचित्र इशारे करतात. अशावेळी खूप लाज वाटते. आणि कुठेतरी मी असुरक्षित आहे याची जाणीव होते. मित्र मैत्रिणींचा ग्रुप असताना आम्ही ग्रुपमधल्या मुलांसोबत जेन्ट्स डब्यात चढतो. त्यावेळी सुद्धा त्यांचे जाणीवपूर्वक मारलेले धक्के आणि त्यांचा नकोसा स्पर्श कळून येतो. ट्रेन काय? बस आणि शेअरिंग रिक्षामध्ये सुद्धा असे अनुभव आले आहेत. कुठेतरी हे थांबायला हवं. यासाठी पुरुषी मानसिकता बदलणं गरजेचं आहे."

- प्रज्ञा खैरे

इनफ इज इनफ नाऊ...अशा लोकांचा विरोध करायला घाबरु नका किंवा लाजूही नका. अशा बेशरमांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. हाच विचार करुन बंगळुरुच्या जास्मिन पाथेजा या मुलीने एक ब्लॉग सुरू केला. त्यानंतर मुंबई, बंगळुरु आणि चेन्नईतल्या काही मुलींनी एकत्र येऊन 'ब्लँन्क नॉईज' नावाने ऑनलाईन कॅम्पेन सुरू केलं. पाहता पाहता त्यांच्या या कॅम्पेनला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महिलांनी त्यांचे अनुभव 'ब्लॅन्क नॉईज' या पेजवर शेअर केले. शिवाय छेडछाड झाली तेव्हा मुलीने काय घातले होते? कोणते कपडे घातले होते? तिचा पेहराव कसा होता? याचेही फोटो 'ब्लॅन्क नॉइज' साइटवर दिले जातात.

#ineveraskforit आणि #walkalone सारखे हॅशटॅगही ब्लॅन्क नॉइजने राबवले आहेत. यामाध्यमातून अनेक महिलांनी आपले अनुभव शेअर केलेत. 

काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एक क्लिप आली होती. खूप चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न या शॉर्ट फिल्ममधून करण्यात आला आहे. देखले...देखले...देखले, तू देखते हुए, कैसा दिखता है...



यासंदर्भात जेव्हा काही मैत्रिणींशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी अशा घटनांकडे दुर्लक्ष केलं. काहींनी याचा फक्त विरोधच नाही तर अशा पिसाळलेल्या मानसिकतेला चांगलीच अद्दल घडवली. अशा मानसिकतेला ठेचायचं आहे तर मग आता घाबरुन चालणार नाही. अशा लोकांना तिथेच रोखायचं आणि ठोकायचंही. आज गप्प सहन कराल तर उद्या हेच बलात्कार करायलाही घाबरणार नाहीत. त्यामुळे बस्स ! आता खूप झालं. #ItsTimeToAct.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा