Advertisement

आपणही कधीतरी 'ज्येष्ठ' होणार आहोत!


आपणही कधीतरी 'ज्येष्ठ' होणार आहोत!
SHARES

खूप दिवसांनंतर निवांत गार्डनमध्ये बसले होते. सुट्टीच्या दिवशी जवळच्याच गार्डनमध्ये आपला फेरफटका ठरलेला असतोच. आपल्याच विचारात गुंग होते. एक आजोबा आले आणि बसू का या बेंचवर? मी पण हो म्हटलं. थोड्या वेळानं ते स्वत:च बोलायला लागले. इकडचे तिकडचे विषय निघाले आणि आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. मग काय, सुट्टी असली की अगदी वेळात वेळ काढून मी गार्डनमध्ये जायचे. त्यांच्यासोबत मस्त गप्पा-टप्पा व्हायच्या. ते नेहमी त्यांच्या मुलाचं कौतुक करायचे. आजोबा तसे खूप बोलके होते. गार्डनमधल्या प्रत्येकासोबतच त्यांचं वरचेवर का असेना, पण बोलणं असायचं. एकदा सुट्टीच्या दिवशी नेहमीप्रमाणे मी गार्डनमध्ये गेले. पण नेहमी येणारे आजोबा मला दिसलेच नाहीत. असं कधीच झालं नव्हतं. मी ओळखीच्या काही लोकांना विचारलं, तेव्हा कळलं की ते गेल्या पाच दिवसांपासून येतच नाहीयेत. मला अजून टेन्शन. नक्की झालं तरी काय? ते कुठे राहतात हे पण माहीत नव्हतं. एक आठवडा गेला. कुठून तरी त्यांच्या घरचा पत्ता हाती लागला. त्यांच्या घरी विचारपूस केली, तेव्ह कळलं की ते आता वृद्धाश्रमात राहतात. त्यांचा मुलगा सांगत होता त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

तात्काळ वृद्धाश्रम गाठलं. आजोबांना समोर पाहून खूप आनंद झाला. आधी तर त्यांच्यावर रागवले की, त्यांनी काहीच सांगितलं नाही. त्यांना यामागचं कारण विचारलं. तेव्हा ते बोलले, “रोज माझे आणि सुनेचे वाद व्हायचे. तिला काही बोललो की, मुलालाही राग यायचा. ज्याला बोलायला शिकवलं तोही मला वाटेल तसा बोलू लागला होता. रोजचंच झालं होतं ते. मग मीच निर्णय घेतला, की आपण वेगळे राहुया. पण विचार केला आता या वयात कुठे एकटं राहणार? म्हणून वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. गंमत म्हणजे फक्त एक आठवडा झाला आहे आणि माझे मित्र पण झाले. माझ्याच वयाचे आहेत सगळे. त्यामुळे दिवसभर गप्पा, मजा मस्ती चालते नुसती. फक्त गप्पा टप्पाच नाही, तर इथे आम्ही अनेक उपक्रम राबवतो. मीच काय, इथे राहणारे सर्वच जे वाटतं ते करतात. बागकाम करणे, जेवण बनवणे, पत्ते खेळणे असे अनेक गेम खेळतो. एगदम मज्जानू लाइफ आहे!" आजोबांचा निर्णय तसा धाडसी होता. पण ते आनंदात होते हे फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी.

विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली आहे. ज्येष्ठांनीही ती स्विकारली आहे आणि हे जोशी आजोबांच्या निर्णयामुळे सिद्ध झालं. फक्त स्वत:च्या मुलांनी सोडलेलेच नाही, तर ज्यांची मुलं नाहीत किंवा ज्या वृद्धांचं कुणीच नाही अशाही वयोवृद्द व्यक्ती या वृद्धाश्रमात पाहिल्या आहेत. वृद्धत्व म्हणजे जणू दुसरं बालपणच. ते सुखाचं आणि समाधानाचं व्हावं, आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी, ही प्रत्येक वयोवृद्धाची इच्छा असते. पण ही रमणीय संध्याकाळ अनेक वृद्ध वृद्धाश्रमात घालवतात आणि तेही आनंदानं.

समाजात वृद्धांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते? यावर पॅन इंडियानं १९ शहरांमध्ये सर्वे केला. यासाठी ४ हजार ६१५ ज्येष्ठ नागरिकांशी बातचित केली. या सर्वेत घरात आणि सार्वजनिक ठिकाणी कशा प्रकारे वृद्धांना वागणूक दिली जाते हे उघड झालं. या सर्वेनुसार ५० टक्के वृद्धांचा घरात छळ केला जातो. त्यांना नीट वागणूक मिळत नाही. मुलांकडून, सुनेकडून किंवा इतरांकडून टोचून बोललं जातं. संपत्तीच्या कारणावरून वृद्धांचा अधिक छळ केला जातो. शिवाय 'तुमच्यासाठी आम्ही किती खर्च करतो' असं वारंवार त्यांना ऐकवलं जातं. त्यामुळे वृद्धांवर एकप्रकारे भावनिक दडपण येतं. पण फक्त घरातच नाही, तर सार्वजनिक ठिकाणी देखील वृद्धांना चांगली वागणूक दिली जात नाही.
बस, मेट्रो, बँक, पोस्ट ऑफिस आणि रस्ते या ठिकाणी ४४ टक्के वृद्धांना अपमानजनक वागणूक दिली जाते. तर ५३ टक्के ज्येष्ठांसोबत भेदभाव केला जातो. त्यापैकी सार्वजनिक बसने प्रवास करणाऱ्या ६५ टक्के ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये जागा न मागता मिळते. पण १६ टक्के ज्येष्ठ नागरिकांना बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचाकडून अपमानजनक वागणूक दिली जाते.


बसमध्ये तरुण आमच्या पायावर पाय देतात, पण ते कधी सॉरी देखील म्हणत नाहीत. त्यांना काही सांगितलं, की आमच्यावरच ओरडतात. ऐवढंच नाही, तर बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या सीटवर तरुण मंडळी बसतात. ज्येष्ठ नागरिकांची जागा स्वत:हून दिली जात नाही. ज्येष्ठ नागरिकांना 'मला बसू द्या' असं सागांवं लागतं, अशी तक्रार एका आजोबांनी केली.

वृद्धांना नेमकं काय वाटतं?

  • ५३ टक्के आजी-आजोबांना आपल्यासोबत भेदभाव होत असल्याचं जाणवतं
  • ६१ टक्के आजी आजोबांना वाटतं की, तरुणांमध्ये सहनशीलता कमी असते. उदाहरणार्थ, आम्ही हळूहळू चालत असल्यास आम्हाला धक्का मारुन तरुण निघून जातात किंवा हळू काम करत असू, तर आम्हाला 'तुमचं वय झालंय आणि हे काम तुम्हाला जमणार नाही' याची जाणीव करुन दिली जाते
  • चांगले कपडे घातले नाहीत, तर अपमानकारक वागणूक दिली जाते, असे ५२ टक्के वृद्धांना वाटते

सार्वनिक ठिकाणी ज्येष्ठांना मिळणारी वागणूक

 ठिकाण
भारतात मिळणारी वागणूक
मुंबईत मिळणारी वागणूक
बँक स्टाफ
१३ टक्के
१९ टक्के
सार्वजनिक हॉस्पिटल
१२ टक्के
४ टक्के
खाजगी हॉस्पिटल
११ टक्के
५ टक्के
पोस्ट ऑफिस
१९ टक्के
१५ टक्के
मॉल स्टाफ
१७ टक्के
१६ टक्के
लाईट बिल भरण्याची रांग
१२ टक्के
८ टक्के
केमिस्ट
१३ टक्के
१४ टक्के
डिलीवरी बॉय
११ ते १९ टक्के
-
भाजी मार्केट
१३ टक्के
१७ टक्के


सर्वेनुसार दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु, भुवनेश्वर आणि चेन्नई या पाच शहरांमध्ये सर्वात अधिक ज्येष्ठ नागरिकांचा छळ केला जातो. त्यामध्ये बंगळुरुत ७० टक्के आणि हैदराबादमध्ये ६० टक्के ज्येष्ठांना अपमानजनक वागणूक दिली जाते.

ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजे त्यांना अपघाताची भीती असते. त्या भीतीपोटी ज्येष्ठ नागरिक घराबाहेरच पडत नाहीत. मुंबईमध्ये ५९ टक्के ज्येष्ठ नागरिकांना कार चालकांकडून तर ४५ टक्के बाईक चालकांकडून आणि ४६ टक्के ट्रॅफिकचे नियम न पाळणाऱ्यांकडून भीती वाटते. मी स्वत: असे अनेक अपघात पाहिले आहेत. 'ये ऊमर में क्यू निकलते हो घर के बाहर', असं बोलणारी तोंडं पण काही कमी नाहीत. 

एकूणच ज्येष्ठ नागरिकांसोबतची वागणूक पाहता 'हेल्पएज'नं 'स्टॉप एजीजम' ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत ज्येष्ठांशी कसं वागलं पाहिजे, यासंदर्भात हेल्पएज इंडिया जनजागृती करत आहे.

वृद्धापकाळ म्हणजे दुसरे बालपण. या वयातही विकास आणि वैयक्तिक वाढ होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांना अपमानात्मक वागणूक ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. या समस्येकडे अधिक करुन दुर्लक्षच झालं आहे. सर्व वयोगटातील नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण एकत्र आलो, तरच ज्येष्ठांसोबत होणाऱ्या अन्यायाविरोधात लढता येईल आणि ज्येष्ठांना योग्य न्याय मिळेल.

- प्रकाश एन. बोरगावकर, संचालक, मुंबई

समाजात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना तुमच्या प्रेमाची आणि मदतीची गरज आहे. कित्येक वेळा ज्येष्ठ नागरिकांची मदतही मी केलीय. पण हा दृष्टिकोन खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळतो. अगदी रस्त्यावर कुणी वयोवृद्ध व्यक्ती असेल, रस्ता क्रॉस करता येत नसेल तर त्यांची मदत खूप क्वचितच केली जाते. सर्रास त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. दुसऱ्यांचं जाऊ दे, पण आपण आपल्याच आई-बाबांना पटकन उलट-सुलट बोलून जातो. 'बाबा तुला हे नाही जमणार, आई तुझं आता वय झालं आहे', असं मस्करीत का होईना, पण आपण हे वाक्य ऐकवतोच. पण विचार करा, त्यांना या सर्व गोष्टींचं किती वाईट वाटत असेल. ज्यांना आपण जन्म दिला, बोलायला, चालायला शिकवलं ते आज आपल्याला दुनियादारी शिकवत आहेत. चेहऱ्यावर दाखवत नसतील पण नक्कीच त्यांचा मनात हेच विचार चालत असतील. आपल्याही नावापुढे उद्या 'ज्येष्ठ नागरिक' लागणार आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं, की या समस्या काही अंशी तरी सुटतील!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा