Advertisement

आई आणि बायकोमध्ये पिचलेल्या नवरोबाची कहाणी!


आई आणि बायकोमध्ये पिचलेल्या नवरोबाची कहाणी!
SHARES

सासू आणि सुनेचे भांडण आता काही नवीन राहिलं नाही. प्रत्येक घरात तू तू-मै मै हे सुरूच असतं. पण यात पिसला जातो तो बिचारा पुरुष. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा हे तुम्ही ऐकलं असेलच. पण इथे मात्र उलटं आहे. आई आणि बायको या दोघींच्या वॉरमध्ये नवऱ्याचे मात्र पुरते सँडविच होत असते. आईची बाजू घेतली की बायको म्हणते "तू ना ममाज बॉय आहेस" आणि बायकोची बाजू घेतली की आई म्हणते "तू बायकोचा बैल” आहेस. पत्नीच्या अपेक्षा पूर्ण करायच्या की आईच्या इच्छांना मान द्यायचा, अशा काञीत तो अडकतो.

आई आणि बायकोमध्ये फसलेल्या नवरोबांची परिस्थिती अनेक मालिकांमध्येही दाखवण्यात आली आहे. कधी सून सासू विरोधात कट कारस्थानं रचते तर कधी सासू सूनेविरोधात षडयंञ रचते. पण मालिकेचा नायक असल्याने तो सर्व सांभाळूनही घेतो आणि मग होते हॅप्पी एंडिंग. पण आयुष्य म्हणजे मालिका नाही. खऱ्या आयुष्यात हा मुद्दा खूप वेगळा आणि किचकट आहे. आई आणि बायकोत समतोल राखणं हे प्रत्येक पुरुषाला जमतंच असं नाही.

आता काही दिवसांपूर्वीच घडलेला एक किस्सा. एका हितचिंतकांच्या घरी मी आणि आई गेलो होतो. गप्पाटप्पा सुरू होत्या. मस्तपैकी सूनबाईंनी चहा आणला. चहाचा एक घोट घेणार तेवढ्यात सासूबाई बोलल्या, "अगं साखर टाकली की नाही यात?” ती पण बोलली, "आई टाकली साखर.” मग साखर लागत का नाही? असं विचारत सासूबाईंनी आपला मोर्चा मुलाकडे वळवला. "काय रे कसा प्यायलास फिक्का चहा?” सूनबाई बोलल्या, "गोड जास्त चांगलं नाही आई. त्यांनीही आता गोड कमी केलंय ना.” मग सासूबाईंनीही संधीचं सोनं करत सूनेला कोपरखळी मारली. हसत हसत त्या बोलल्या, "लग्नानंतर मुलाला फिका चहाही गोड लागायला लागला.” आईचं 'बाळ' आणि बायकोचे 'अहो' यांना काय बोलावं हेच कळत नव्हतं. आम्हीही हसण्यावारी नेऊन चहावर लक्ष केंद्रीत केलं. तेव्हा मला प्रश्न पडला की, आई आणि बायकोच्या कात्रीत अडकलेल्या प्रत्येक पुरुषाला आयुष्यात या परिस्थितीचा सामना कधी ना कधी करावा लागतच असेल.

महिलांचं किचनवर वर्चस्व असतं. मग आई आणि बायकोत मुलाचा आवडता पदार्थ बनवण्यावरूनही चढाओढ होते. कधी आईने केलेल्या कोणत्या तरी पदार्थाचं मुलगा खूप कौतुक करतो तर बायकोने केलेल्या पदार्थाचं कौतुक करायला मात्र विसरतो. मग काय? बायकोचा चेहरा पडतो. कधी जेवणात मीठ कमी पडतं. कधी तिखट कमी जास्त होतं तर कधी जेवण अळणी किंवा खारट बनतं. या छोट्या गोष्टींवरून आई आणि बायकोत काही ना काही कुरकुर सुरूच असते आणि या सर्वाचा मनस्ताप होतो तो नवऱ्याला.

ज्यांचं नवीन लग्न झालं आहे ते जास्त भरडले जातात किंवा त्यांची अधिक तारांबळ उडते, हे काही महिलांशी आणि पुरुषांशी बोलल्यावर समोर आलं. नवीन लग्न झालं तेव्हा काही स्त्रियांना त्यांचा नवरा 'ममाज बॉय' आहे हे जाणवायचं. पण वेळेनुसार काही स्त्रियांच्या हे अंगवळणी पडलं. तर काहींनी या सर्वांसोबत तडजोड केली. खरं पहायला गेलं तर हा नात्यांचा गुंता आहे आणि हा गुंता सोडवण्यासाठी मार्ग शोधावाच लागतो. काही पुरुष हा गुंता सोडवण्यात यशस्वी ठरतात. तर काही जणांचे हात पोळतात. पण जरी हात पोळले तरी त्यातून ते धडा शिकतात. मग कोणती गोष्ट कुठे आणि कशी टॅकल करायची हे मग नवरोबांनाही समजू लागतं. तर काहींना हा गुंता सोडवता येत नाही आणि मग त्यांची आतल्या आत घुसमट होऊ लागते. अशा वेळी घरचं वातावरण एकूणच चिघळतं. मनात चाललेली घुसमट ९९ टक्के पुरुष कोणाला सांगत नाहीत. स्वत: त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यांना परिस्थितीतून मार्ग काढायला जमत नाही त्यांची आतल्याआत कोंडी व्हायला लागते. या सर्वाचा परिणाम होऊन पुरुष मानसिक तणावात जातात.

नक्की बिनसतं कुठे?

"खरंतर अशा परिस्थितीत बायको आणि आई या दोघींनी समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. जर दोघींच्यात छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतील तर दोघींनी एकत्र येऊन संवाद साधणं गरजेचं आहे. अशा वेळी अबोला धरला तर वाद आणखी चिघळू शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टी खटकत असतील तर त्या संदर्भात दोघींनी एकमेकांशी बोलून त्यातून मार्ग काढलेला चांगला. जर दोघी पुढाकार घेत नसतील तर मुलानेच पुढाकार घ्यावा आणि वाद कसा निवळेल हे पाहावं. आमच्याकडे एक केस आली होती. लव मॅरेज होतं. पण मुलाच्या घरातून विरोध होता. आईला मुलगी पसंत नव्हती. खूप प्रयत्नांनंतर त्याने त्याच मुलीशी लग्न केलं. पण लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये वाद व्हायचे. एकीकडे आई आणि दुसरीकडे बायको. त्याला कळायचंच नाही की नक्की कुणाची बाजू घेऊ? आईची बाजू घेतली की बायको नाराज. बायकोची बाजू घेतली की आई नाराज. यामुळे तो प्रचंड तणावाखाली गेला. त्याला फिट्स येऊ लागल्या. त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडायचे नाहीत. त्याचं कुटुंब त्याला ट्रिटमेंटसाठी घेऊन आलं तेव्हा त्याच्याशी बोलल्यानंतर कळलं त्याला नेमका त्रास काय होत होता ते. तेव्हा त्याच्या मनातली घुसमट बाहेर आली. कधी कधी बायको किंवा आईशी जुळवून घेण्यासाठी आपण त्यांच्या हो मध्ये हो करतो आणि त्यांचे हट्ट पुरवतो. अशा वेळी जो चुकीचा आहे त्याला तिथेच विरोध करणं गरजेचं आहे. मग आई असो वा बायको. चुकत असेल तर त्यांना त्याची जाणीव करून दिलीच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मानसिक ताण अावाक्याबाहेर जातो तेव्हा वेगळ्या प्रकारे त्याचे दुष्परिणाम दिसतात.”

- ज्योती सोनावणे, कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट

या मानसिक विश्लेषणात किती वास्तविकता आहे हे पडताळून पहाण्यासाठी काही कुटुंबांशी संवाद साधला. कधी कधी काही गोष्टी नवऱ्याच्या हाताबाहेर जातात. त्यामुळे मुलगा आई-वडिलांपासून वेगळं रहाण्याचा निर्णय घेतो. तर कधी नाइलाजास्तव नवरा आणि बायको वेगळं होण्याचा पर्याय निवडतात. 

"अशा परिस्थितीत योग्य ती बाजू उचलून धरायला पाहिजे. मग ती आईची असो किंवा बायकोची. मुळात मुद्दा आई किंवा सुनेचा नसून पारंपरिक पद्धतीने एखाद्याला नियंत्रित करण्याच्या वर्चस्ववादी प्रवृत्तीचा असतो. कालांतराने ही गोष्ट नातं मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. चूक ते चूक. उगीच खोटा आव न आणता योग्य बाजू घेणं महत्त्वाचं आहे. शेवटी भावनेच्या आहारी न जाता बाजू घेणे आणि दोघींपैकी जी चुकीची वागते असं वाटेल तिला विरोध करणं गरजेचं आहे. त्यात नवरा किंवा मुलगा ही भूमिका बाजूला ठेवावी. मग जास्त सोपं जाते. लोकांचा मुख्य गोंधळ मुलगा किंवा नवरा बनून बाजू घेण्यात होतो. त्यामुळे प्रश्न जास्त चिघळतात आणि सासू सूनेसोबत अजून एक व्यक्ति परिस्थिती खराब करतो तो म्हणजे नवरा किंवा मुलगा. तो पीडित नसतो, बरोबरीचा जबाबदार असतो.”
- संजय पांडे

"माझा नवरा 'ममाज बॉय'पेक्षा 'पपाज बॉय' आहे म्हणायला हरकत नाही. सर्वात आधी तो आई आणि पप्पांचा विचार करतो. खूप वेळा असं होतं की कित्येक गोष्टी मला माहीतच नसतात. माहीत नसतात म्हणण्यापेक्षा मला सांगितल्याच जात नाहीत. माझ्याशी गोष्टी शेअर करण्यापेक्षा त्या आई आणि वडिलांशी सर्व शेअर करतो. तो आईशी शेअर करतो यावर माझा काही आक्षेप नाही. पण त्याने माझ्याशीही शेअर करावं असं मला वाटतं."
- अवनी ( बदलेलं नाव )

"माझ्या आई आणि बायकोमध्ये नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात. उदाहरणार्थ, माझी आई रात्री जास्त पीठ भिजवून ठेवायला माझ्या बायकोला सांगते. रात्रीच जास्त पीठ भिजवलं तर सकाळी नाष्ट्याला चपात्या करता येतात, असं माझ्या आईचं मत आहे. पण रात्री पीठ भिजवून सकाळी चपात्या करणं आरोग्यासाठी चांगलं नाही असं माझ्या बायकोला वाटतं. जेव्हा चपात्या करायच्या आहेत तेव्हाच पीठ भिजवावं, असे बायकोचं मत असतं."
- किरण ( बदलेलं नाव )

"कधी-कधी छोट्या मोठ्या गोष्टींवरून आई-बायकोमध्ये तू तू-मै मै होत असते. पण आपण समजून घेतलं की सर्वच सोपं असतं. दोन्हींचा ताळमेळ साधणं काही कठीण नाही. ज्या ठिकाणी आई बरोबर आहे तिकडे आईची बाजू आणि जिथे बायको बरोबर आहे तिथे बायकोची बाजू घेतो. महत्त्वाचं म्हणजे कितीही वाद होवोत, त्या दोघी एकमेकींना समजून घेतात. त्यामुळे शक्यतो छोट्या मोठ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहचतच नाहीत."
- जयदीप दाभोळकर

"लग्नानंतर स्त्री आपलं घर-दार सोडून सासरी येते. तिला समजून घ्यावं अशी तिची माफक अपेक्षा असते. माझी ही तीच अपेक्षा आहे. माझ्यामुळे आणि सासूमुळे नवऱ्याची ओढाताण होते हे मान्य आहे मला. पण त्यात त्याला बॅलेन्स करता आला पाहिजे. माझ्याकडून जर समजून घेण्याची अपेक्षा असेल, तर मलाही नवऱ्याने आणि माझ्या इन-लाॅजने समजून घेतलं पाहिजे."
- ओवी ( बदलेलं नाव )

"विवाहाआधी आणि नंतर पुरुषांचं जीवन म्हणजे अक्षरशः त्रेधातिरपीट असते. कारण तो जुन्या आणि नव्या पिढीमधला सांधा, दुवा असतो. त्याला एकीकडे आई आणि दुसरीकडे बायको असं दोन्हीकडे मॅनेज करावं लागतं. संपूर्ण चित्रच बदलतं. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आताच्या मुली आणि त्यांचे पुढारलेले विचार यामुळे लग्नानंतर मुली अॅडजस्ट करतात. पण ते मनापासून स्विकारणाऱ्या फारच कमी असतील. ही वस्तुस्थिती आहे. आजच्या आधुनिक जगात मुलींना घरचं आणि बाहेरचं सांभाळणं अवघड होतं. आजकालच्या बहुतांश मुलींना सासूशी बोलणं, त्यांच्या अनुभवाचा सल्ला घेणं कमीपणाचं वाटतं. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पुरुषांना अनुभवायला येतात. अशा अनेक गोष्टी अनुभवल्यावर 'शादी का लड्डू, जो खाये वो भी आैर न खाये वो भी पछताये', हे ज्याने कोणी म्हटलंय ते 100 टक्के खरं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही."
-सुधांशू जोशी

"माझं नवीन लग्न झालं तेव्हा मला वाटायचं की नवरा आईचीच बाजू घेतो. काही झालं तरी त्याचा आईचाच जप चालायचा. पण आज मी माझ्या सासूच्या जागेवर आहे. मलाही एक मुलगा आहे आणि त्याची बायको आज माझ्या जागेवर आहे. त्यामुळे मी लग्न करून या घरात आले तेव्हा माझ्या सासूची जी घालमेल झाली असेल ते मी आज अनुभवतेय. मीही कधी तरी सून होतेच. त्यामुळे माझ्या सूनेच्या मनात काय चालू असेल याचाही मला अंदाज आहे. हे नेहमी माझ्या लक्षात असतं. त्यामुळे काही गोष्टी टॅकल करायला मदत मिळते. जर प्रत्येक सासू-सूनेनं हाच विचार केला तर मुलावर ही वेळच येणार नाही."
- सुलोचना ( बदलेलं नाव ) 

"आई आणि बायकोत सँडविच होण्याची गरज नसते. दोघींच्यात समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही दोघींच्यात समन्वयकाची भूमिका निभावली पाहिजे". 

- नितीन हळदणकर

हल्ली न्यूक्लियर फॅमिलीचा ट्रेण्ड जोरात सुरु आहे. मात्र त्याचवेळी घटस्फोट आणि वादावादीची प्रकरणंही वाढत आहेत. त्यामुळे ज्येष्ठांचं मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं आहे. पण मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवतानाच नव्या विचारांनाही तितकंच महत्त्व देणं आवश्यक आहे. घराघरात दिसणारा (आणि कधी न दिसणारा) सासू-सुनेमधला वाद आणि त्यामध्ये घरातल्या पुरुषांची होणारी कोंडी हे चित्र नित्याचंच आणि त्यामुळे आताशा नैसर्गिक जरी वाटू लागलं असलं, तरी तेच योग्य मानण्यात अजिबात शहाणपण नाही. वाद असावेतच, मात्र त्याबरोबरच समजुतदारपणाही असेल, नव्याने जुन्याला आणि जुन्याने नव्याला समजून घेण्याची तयारी असेल, तर कदाचित दोघींना आणि पर्यायाने नवरोबांनाही होणारा मनस्ताप कमी होईल. तो नाहीसाच झाला तर काय, सोन्याहून पिवळं!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा