खईके पान चेंबूर वाला...

चेंबूर - पानाची टपरी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. साधारणतः व्यसनी मंडळींचा गराडा पडलेल्या पानाच्या टपरीवर कुटुंबासह जाणं टाळलं जातं. महिला, मुली, लहान मुलांना तर इथं जणू नो एंट्रीच. हेच लक्षात घेऊन किशोर माकंड यांनी त्यांच्या मुलासह चेंबूरमध्ये पानवाला बुटिक हे दुकान सुरू केलंय.

या पानवाला बुटिकचे वैशिष्ट्य म्हणजे, छगन मिठा पेट्रोलपंपाजवळचं हे दुकान चक्क एअर कंडिशनर आहे. माकंड पिता-पुत्र स्वतः उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांनी तंबाकूला त्यांच्या दुकानांतल्या पानांतून हद्दपार केलंय. तंबाकूमुळे कॅन्सर होतो, असं सांगणारी, जनजागृती करणारी पोस्टर या दुकानात आहेत. हेसुद्धा दुकानाचं वैशिष्ट्य ठरावं.

20 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या फ्लेवरचं पान तुम्हाला इथं खायला मिळेल. चॉकलेट पान, चॉको चिप्स, चॉको फन्टास्टिक, व्हॅनिला क्रीम, पान शॉट्स, शाही गुलाब, पान सालसा, नाइट क्वीन, दबंग, पान बहार, पान आइस ब्लास्ट, पान रॉक ऑन, डीप फ्रिज, मिंट मोजिटो, पान बुखरा, ड्राय फ्रूट पान, पान कॅन्डी, आईस्क्रीम, चॉकलेट बॉम्ब आणि स्ट्रॉबेरी क्रश... कुठलीही जाहिरात न करताही चेंबूरमधलं हे दुकान सुप्रसिद्ध आहे. तर लग्नांतही इथली पानं आवर्जून नेली जातात. माकंड यांनी दुकानाच्या शाखा आता मुलुंड, वांद्रे, पवई आणि नवी मुंबईतही सुरू केल्यात. मग जेवणानंतर सहकुटुंब पान खाण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर या शॉपला भेट द्यायलाच हवी.

Loading Comments