Advertisement

पावसाळी पर्यटनास ठाणे जिल्ह्यात बंदी, 'ही' आहेत बंदीची ठिकाणं

पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांना जाता येणार नाही.

पावसाळी पर्यटनास ठाणे जिल्ह्यात बंदी, 'ही' आहेत बंदीची ठिकाणं
SHARES

ठाणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनावर जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या परिसरात पर्यटकांना जाता येणार नाही. पर्यटकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये आणि अपघातात जिवीतहानी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटनावर बंदी घातली आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार,जिल्ह्यातील धबधबे, तलाव आणि धरणांच्या सभोवतालच्या १ किलोमीटर परिसरात पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे, त्या पाण्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे आणि पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे या ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास, मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करण्यास, मद्य बाळगण्यास, मद्य वाहतूक करण्यास आणि अनाधिकृतरित्या मद्य विक्री करण्यासही बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, महिलांची छेडछाड करणे, पर्यटन स्थळांवर ध्वनी, वायू आणि जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

ही आहेत बंदीची ठिकाणं  

येऊर परिसरात असणारे धबधबे, जिल्ह्यातील सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, सिद्धगड, डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, भातसा धरण परिसर, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख, रेतीबंदर, पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळु चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारा, कळंबे नदी किनारा, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा खोपवली, गोरखगड, सिंगापूर नानेघाट, धसई धरण, आंबेटेबे, मुरबाड आणि कसारा येथील सर्व धबधबे, कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी, भिवंडी नदीनाका, गणेशपूरी नदी परिसर, कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा