Advertisement

उन्हाळा बाधतोय?..मग ही फळं खा!


उन्हाळा बाधतोय?..मग ही फळं खा!
SHARES

उन्हाळा सुरु झाला की घरातून बाहेर पडायचाही कंटाळा येतो. त्यात आता मुंबईतलं तापमान दिवसेंदिवस वाढतच चाललंय. उन्हाच्या त्रासामुळे कित्येक जण आजारीही पडू लागलेत. ऑफिस असलेल्या लोकांना तर घरी बसण्याचाही पर्याय निवडता येत नाही. मग किमान अशा वेळी स्वतःच्या तब्येतीची काळजी तरी आपण घ्यायलाच हवी. तेव्हा उन्हाळ्यात कोणती फळं खाऊन आपल्या शरीराला फायदा होईल आणि ती फळं उन्हाळ्यात का खावीत? ते जाणून घेऊयात.

ताडगोळा :

ताडगोळ्यात ८६ टक्के पाणी असतं. त्यामुळे ते आपल्या शरीरातील आद्रता टिकवण्यात मदत करतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातील तापमान संतुलित रहातं. ताडगोळ्यात जीवनावश्यक खनिजतत्व असतात. तसंच त्यात व्हिटॅमिन A, B आणि C असतं. त्यामुळे उन्हाळ्यात घामामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या खनिजांची कमतरता पूर्ण केली जाते. ताडगोळ्यात जास्त कॅलरीज नसतात. त्यामुळे वजनही वाढण्याचा धोका नसतो. उन्हाळ्यात पोटही जास्त प्रमाणात बिघडतं अशावेळी ताडगोळ्यात असलेले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यासही मदत होते. घामोळ्या आल्या असल्यास ताडगोळा खावा. 

कलिंगड :

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन A आणि C असतं. कलिंगड शरीरातील आद्रता टिकवून ठेवण्यात मदत करतं. त्यामुळे शरीरातील तापमान संतुलित राहण्यास मदत होते. कलिंगडामध्ये लाईकोपिन नावाचं फायटो केमिकल असतं. जे कॅन्सर प्रतिबंधक मानलं जात. तसेच कलिंगड हृदयरोगासही प्रतिबंध करतं.

आंबा :

आंबा हे आदर्श फळ मानलं जातं. आंब्यात बीटा कॅरोटिन असतं जे आपलं सूर्याच्या घटक किरणांपासून रक्षण करतं. तसेच त्यात व्हिटॅमिन A, B, C सहित सेलिनिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसारखी खनिजतत्वसुद्धा आहेत. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेची सुंदरता टिकवण्यासाठी आंब्याचा उपयोग होतो. आंब्यात लोग्लोसेनिक इंडेक्स असल्याने ज्यांना मधुमेह आहे तेही आंब्याचा आस्वाद घेऊ शकतात. तसेच उन्हाळ्यात कैरीचं पन्हं तुम्हाला उष्माघातापासून वाचवू शकतं.

अंजीर :



अंजीर हे खूप आयोग्यदायी फळ मानलं जातं. अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. तसेच व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन K असतं. अंजीरमध्ये खनिजतत्व सुद्धा आहेत. तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करायला मदत होते. तसेच पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब कमी राहण्यास मदत होते. रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठीही अंजीर फायदेशीर आहे.

जाम :


जाम ह्या फळामध्ये तंतुमय पदार्थ असतात. तसेच व्हिटॅमिन A आणि C असतात. ह्यामध्ये थायमिन, नायसिन सल्फर पोटॅशियम सारखे खनिजतत्वही असतात. त्यामुळे यकृतातील दूषित तत्व बाहेर पडण्यास मदत होते. जामचा उपयोग मूत्रपिंडाचं आरोग्य राखण्यास तसेच मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास होतो. फीट येणे, डोळे येणे आणि देवी आल्यासही हे फळ उपयुक्त आहे.

नारळ :

नारळाच्या पाण्यात मिनरल असतात आणि साखरेचं प्रमाणही असतं. त्यामुळे उन्हाळ्यात चक्कर आल्यास नारळाचं पाणी प्यावं. तसेच उन्हाळ्यात उन्हाळी लागल्यास नारळाचे पाणी उपयुक्त ठरते . मूत्रविकार झाल्यास नारळाचे पाणी प्यावे. नारळाच्या आतील मलई शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते. तसंच उन्हाळ्यात जेवण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी नारळाची मलई खावी.

माहिती :

कांचन पटवर्धन ( डाएटिशिअन / न्यूट्रिशिअन )

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा