Advertisement

पुस्तक ते सिनेमांचा प्रवास


पुस्तक ते सिनेमांचा प्रवास
SHARES

'World Book Day' अर्थात 'जागतिक ग्रंथ दिवस' दरवर्षी '२३ एप्रिल' ला साजरा केला जातो. पुस्तकाशी शालेय जीवनात आपली जमलेली गट्टी पार उतारवयापर्यंत टिकते. अगदी आपसूकच.  त्यासाठी तुम्ही 'ग्रंथप्रेमी' वगैरे असण्याची गरज नसते. पण आजच्या म्हणजे टेक्नोलॉजीच्या जगात काँप्युटर आणि इंटरनेटच्या मदतीने आपल्याला सगळ्या गोष्टी वाचण्यासाठी सहज उपलब्ध होतात. परिणामी, आपण कळत नकळत पुस्तक नावाच्या मित्रापासून दूर निघत चाललो आहोत. 

'इंटरनेट'नं सान-थोरांना आपल्या  जाळ्यात अलगद खेचून घेतलं आहे. या जाळ्यात गुरफटलं जाणं ओघानं आलंच. पुस्तक आणि वाचकांमधली दरी कमी करण्यासाठी युनेस्को ने ' २३ एप्रिल ' हा 'ग्रंथदिन' म्हणून साजरा  करण्याचा निर्णय घेतला. २३ एप्रिल हाच दिवस निवडण्याचं कारण ठाऊक आहे ना? जगातल्या सर्वश्रेष्ठ साहित्यिकांमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं त्या विल्यम शेक्सपियरचा हा जन्मदिवस आणि स्मृतिदिनही! 

पुस्तकं आणि चित्रपटांचं नातंही अगदी जुनं. पण तूर्त आपण मराठी पुस्तकं आणि त्यावर आधारित चित्रपटांवर बोलणार आहोत. मराठी साहित्यकृतींवर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती आजवर झाली. पण आपण वाचकांसोबतच चित्रपट रसिकांच्या पसंतीची पावती मिळवणा-या मोजक्या, ३ चित्रपटांचा परामर्श घेणार आहोत.


'श्यामची आई '  


'श्यामच्या आई' पासून सुरुवात करूयात. पुस्तकांवर आधारित सिनेमा करण्याची सुरुवात ''श्यामची आई' पासून झाली. 'श्यामची आई' ही जवळपास प्रत्येक घरात पोहोचलेली पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजींनी लिहिलेली मराठी  साहित्यकृती आहे. नाशिकच्या  कारागृहात असताना ९ फेब्रुवारी १९३३  रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. आजवर या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. 'श्यामची आई' हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरुजींच्या हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती आणि कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे ते लिहून संपविले. 'मातेचा महिमा' हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत घरातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचं चित्रही यात आलं आहे.

हे पुस्तक खूप गाजल्यानंतर इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई ' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यावर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे यांनी श्यामची आई चित्रपटाच्या पडद्यावर आणली. कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. किंबहुना 'श्यामची आई' सर्वोत्तम चित्रपटासाठी 'सुवर्ण कमळा'वर नाव कोरून मराठी चित्रपटांना नेमकी दिशा दाखवली.  


शाळा :


मिलिंद बोकील यांनी लिहिलेली 'शाळा' ही कादंबरी. मुकुंद जोशी हा कथानायक सुखदेव नामदेव वर्‍हाडकर हायस्कूल या शाळेत इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी आहे. त्याचा मित्र सुरेश म्हात्रे उर्फ सुऱ्या याच्या वडिलांनी शाळेच्या वाटेवर बांधायला काढलेल्या इमारतीमध्ये शाळा भरण्याआधी मुकुंद, सुऱ्या, चित्र्या आणि फावड्या असे चौघे मित्र जमून येणाऱ्या-जाणाऱ्या सहाध्यायिनींची लपून राहून अश्लील भाषेत टिंगल करणं, उरलेला गृहपाठ एकमेकांच्या मदतीने पूर्ण करणं, इत्यादी गोष्टी करतात. पौगंडावस्थेतल्या या मुलांच्या मनात वर्गातल्या/शाळेतल्या मुलींविषयी स्वाभाविक आकर्षण आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी करणे, त्या व्यक्तीने तसाच प्रतिसाद दिल्याचा आनंद व एकीकडे या नात्याच्या भविष्याविषयी मनात निर्माण होणारा संभ्रम, आवडत्या व्यक्तीने दिलेल्या नकारातून उद्भवणारी निराशा, याखेरीज त्या व्यक्तीने शाळेत तक्रार केल्याने उद्भवणारे प्रकरण व शिक्षा, असे अनेक प्रसंग मुकुंदाच्या नजरेतून मांडत कादंबरी पुढे सरकते. मुकुंदाच्या बहिणीला त्यांच्याच चाळीत राहणाऱ्या विजयबद्दल वाटणारे आकर्षण, अनिता आंबेकर या शाळेत नव्याने आलेल्या विद्यार्थिनीचं शिक्षकाच्या प्रेमात पडणे आणि त्या प्रकरणातून तिने आत्महत्येचा प्रयत्न करणं, मुकुंदाला जिवलग मित्रासारखा वाटणारा त्याचा नरुमामा, महेश-सुकडीचं प्रेमप्रकरण, चित्र्या आणि त्याचा भाऊ राजू यांना सांभाळायला ठेवलेली देवकी नावाची चळलेली बाई इत्यादी उपकथानकं कादंबरीत येतात. नववीच्या परीक्षेचा निकाल लागतो. कादंबरीची नायिका शिरोडकर ही वडिलांची बदली झाल्याने गाव सोडून गेल्याचे मुकुंदाला समजतं. तिची भेट न होण्याचा व आधीच्या काही प्रसंगांतून झालेले गैरसमज दूर करता न आल्याचा सल मुकुंदाच्या मनात राहणं, बरोबरीचे काही मित्र नापास झाल्याने, चित्र्याचे कुटुंब इतरत्र हालणार असल्याचं समजल्यानं शाळेतले आधीचे हवेहवेसे दिवस संपून दहावीच्या वास्तवाच्या वळणाशी मुकुंदाला आणून सोडत कादंबरी संपते.

२൦१२ मध्ये सुजय डहाके यांनी ह्या कादंबरीवर सिनेमा केला.पौगंडावस्थेतल्या मुलाचं शाळेतलं प्रेमप्रकरण आणि आणीबाणी या दोनच गोष्टींभोवतो गुंफलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला.


दुनियादारी :


सुहास शिरवाळकर यांनी लिहिलेली ' दुनियादारी ' ही कादंबरी. ही आहे एक काल्पनिक सत्यकथा . तुमची, माझी, आपल्या मित्रांची. घराघरातून नित्य घडत असणारी. म्हणूनच, जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद, दु:ख, प्रेम-मत्सर या भावना मानवी मनात अनंत आहेत; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे, तो पर्यंत ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली सत्य अमर कथा आहे. ही कादंबरी खूप गाजली. २०१३ मध्ये ' दुनियादारी ' या कादंबरीवर दिग्दर्शक संजय जाधव यांनी सिनेमा केला. सुहास शिरवळकर यांच्या 'दुनियादारी'या पुस्तकानं मागच्या दोन-तीन पिढ्यांवर आपलं गारूड घातलं होतं. त्या कादंबरीवरून सिनेमा होणं, तो इतक्या सशक्तपणे पडद्यावर सादर होणं, त्यात आजचे आघाडीचे तारे-तारका असणं आणि या साऱ्याचा उत्तम सूर जुळून येणं, हे या सिनेमामध्ये झालं.जेवढी 'दुनियादारी ' कादंबरी गाजली त्याहून अधिक त्यावर बनवण्यात आलेला सिनेमा ही गाजला. याचं श्रेय चित्रपटातल्या कलावंत, दिग्दर्शक, संगीत आदी घटकांना त्याहूनही अधिक लेखक सुहास शिरवळकर यांचं आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा