Advertisement

मराठीची वारी लंडनच्या दारी

आज मराठी चित्रपटांचा कॅनव्हास इतका मोठा झाला आहे की, अख्खे सिनेमेच विदेशी धर्तीवर शूट होऊ लागले आहेत. त्यामुळं आज मराठी सिनेमांची वारी लंडनच्या दारी असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

मराठीची वारी लंडनच्या दारी
SHARES

आज मराठी चित्रपटांचा कॅनव्हास इतका मोठा झाला आहे की, अख्खे सिनेमेच विदेशी धर्तीवर शूट होऊ लागले आहेत. त्यामुळं आज मराठी सिनेमांची वारी लंडनच्या दारी असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

यापूर्वी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटामधील काही भाग, तसंच 'वन वे टिकीट' चित्रपटाचा ३०-४० टक्के भाग लंडनमध्ये शूट झाला होता. दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी संजय नार्वेकरची मुख्य भूमिका असलेल्या 'बाबूरावला पकडा' या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये केलं होतं, पण दुर्दैवानं चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाचाही काही भाग लंडनद्ये शूट करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'ती अँड ती' या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये केलं होतं. या चित्रपटानंतर मात्र मराठी सिनेमांनी लंडनमध्ये शूट करण्याचा जणू धडाकाच लावला आहे.

मागच्या वर्षी सुरुवातीलाच गाजलेल्या 'ये रे ये रे पैसा' या चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'ये रे ये रे पैसा २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलं आहे. हेमंत ढोमेच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर आदी कलाकार आहेत. एव्हीके एन्टरटेन्मेंट प्रोडक्शनच्या या  चित्रपटात प्रेक्षकांना लंडनमधील कथानक पहायला मिळणार असल्याचं कलाकारांकडून सांगण्यात येत आहे.

याशिवाय अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांनी नुकतंच आपल्या 'दे धक्का २'ची घोषणा केली आहे. 'दे धक्का'मध्ये महाराष्ट्राच्या खेड्यात सुरू झालेली कथा आता थेट लंडनला पोहोचली आहे. त्यामुळं हा चित्रपट लंडनमध्ये शूट होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर 'वेलकम टू लंडन' असं म्हटलं आहे. त्यामुळं चित्रपटाचं महत्त्वाचं कनेक्शन लंडनशी असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 'दे धक्का'मधील मकरंद अनासपूरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव ही स्टारकास्टही 'दे धक्का २'मध्ये दिसेल. इतर कलाकार कोण असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश आणि सुदेश मांजरेकर हे भाऊ करणार आहेत. 

या दोन सिनेमांखेरीज 'झिम्मा' असं अस्सल मराठमोळं शीर्षक असलेला सिनेमाही सध्या लंडनमध्ये चित्रीत होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनही हेमंत ढोमे करत आहे. सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, क्षीती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी अशी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची स्टारकास्ट आहे. केवळ एक अभिनेता आणि सर्व अभिनेत्री असल्यामुळं या चित्रपटाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल आहे. या चित्रपटाखेरीज गायक-संगीतकार-दिग्दर्शक-निर्माता अवधूत गुप्तेचा आगामी मराठी सिनेमाचा काही भाग लंडनमध्ये शूट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. याखेरीज मराठी चित्रपटांच्या आणखी दोन निर्मात्यांनी लंडनमध्ये चित्रीकरण करण्याची योजना आखली आहे. लंडनमध्ये चित्रीत होणाऱ्या या चित्रपटांसोबतच अभिनेता-दिग्दर्शक शंशांक उदापूरकरनं अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्यासोबत 'प्रवास' या आगामी सिनेमाचा काही भाग अमेरिकेत शूट केला आहे. 

हे चित्र पाहता लंडननं मराठी निर्माता-दिग्दर्शकांवर मोहिनी घातल्याचं निदर्शनास येतं. यामागील कारण शोधताना असं समजलं की, लंडनमध्ये एकदा शूटिंगसाठी फी भरली की पुन्हा पुन्हा पैसे भरावे लागत नाहीत. प्रत्येक लोकेशनसाठी वेगळी परवानगी काढण्याची डोकेदुखीही करावी नाही. त्यामुळं तो खर्च कमी होतो. तिथली लोकेशन्सही फ्रेश असतात. इथे लोकल लेव्हलला शूट करताना बराच त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक वेळी वेगळी परवानगी काढावी लागते. कित्येकदा परवानगीखेरीजही बराच खर्च करावा लागतो. परदेशी जाण्याचा आणि राहण्याचा खर्च वाढत असला तरी कलाकार-तंत्रज्ञही एकाच जागी उपलब्ध असतात. त्यामुळं शूट करणं सोपं जात असल्यानं मराठी चित्रपटांनी सध्या लंडनमध्ये मुक्काम ठोकल्याचं समजतं.



हेही वाचा-

टोरंटोमध्येही आकाश होणार गुलाबी

महेश मांजरेकर पुन्हा देणार 'धक्का'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा