EXCLUSIVE : झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी मंगेशनं घेतलं उंदीर मारण्याचं ट्रेनिंग

रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी काही कलाकार नेहमीच कठोर मेहनत घेत असतात. यापैकीच एक असलेल्या अभिनेता मंगेश देसाईनं झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी चक्क उंदीर मारण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे.

  • EXCLUSIVE : झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी मंगेशनं घेतलं उंदीर मारण्याचं ट्रेनिंग
  • EXCLUSIVE : झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी मंगेशनं घेतलं उंदीर मारण्याचं ट्रेनिंग
SHARE

रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी काही कलाकार नेहमीच कठोर मेहनत घेत असतात. यापैकीच एक असलेल्या अभिनेता मंगेश देसाईनं झी टॅाकीजवर 'हजेरी' लावण्यासाठी चक्क उंदीर मारण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे.


मुख्य भूमिकेत

'एक अलबेला'मध्ये हिंदी चित्रपटातील मराठमोळे नायक दि ग्रेट भगवानदादा साकारल्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'जजमेंट' या मराठी चित्रपटात मंगेश देसाईनं खलनायक साकारला होता. सर्वांगसुंदर अभिनयाद्वारे मंगेशनं साकारलेल्या या खलनायकाचं कौतुक झाल्यानंतर मंगेश पुन्हा एकदा नायकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या 'क्राइम पेट्रोल' या हिंदी मालिकेमध्ये धडाकेबाज पोलिस अधिकारी साकारणारा मंगेश लवकरच झी टॅाकीजची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना मंगेशनं स्वत:च याबाबतची माहिती दिली आहे.


असं घेतलं ट्रेनिंग

मंगेशची मुख्य भूमिका असलेला 'लाल बत्ती' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटासाठी त्यानं पोलिस प्रशिक्षण घेतलं होतं, तर झी टॅाकीजच्या 'हजेरी' या आगामी मराठी चित्रपटासाठी उंदीर मारण्याचं ट्रेनिंग घेतलं आहे. या दोन परस्परभिन्न ट्रेनिंगबाबत मंगेश म्हणाला की, हे खरं आहे. 'लाल बत्ती' या चित्रपटातील 'क्वीक रिस्पॅान्स टीम'चा अधिकारी बनण्यासाठी पोलिसांचं प्रशिक्षण घेणं जसं गरजेचं होतं, तसंच 'हजेरी' या चित्रपटासाठी उंदीर मारण्याचं ट्रेनिंग घेणंही आवश्यक होतं. यासाठी उंदीर नेमका कसा मारतात याचं प्रात्यक्षिक पाहिलं. त्यासाठी काठी कशाप्रकारे हातात पकडायची, उंदीर येण्याची वाट पहायची, त्याचे पळण्याचे मार्ग ब्लॅाक करायचे आणि उंदीराच्या चपळाईनंच त्याच्यावर वार करायचा सराव करावा लागला.


भूमिकेची गरज म्हणून...

चित्रपटातील एखादी भूमिका सजीव करण्यासाठी सारं काही करावं लागतं असं मंगेशचं प्रामाणिक मत आहे. यासाठीच तो कशा प्रकारचंही प्रशिक्षण घ्यायला मागे पुढे पहात नाही. उंदीर मारण्याचं ट्रेनिंग घेण्यामागचं कारण सांगताना मंगेश म्हणाला की, या चित्रपटाची कथा बृहन्मुंबई महानगर पालिकेसाठी उंदीर मारण्याचं काम करणाऱ्या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. पूर्वी उंदीरांमुळे प्लेगसारख्या महाभयंकर रोगाचा फैलाव व्हायचा. आपल्याकडे प्लेगची साथ आली होती, तेव्हापासून पालिकेतर्फे उंदीर मारण्यासाठी कामगारांची नियुक्ती करण्यात येऊ लागली. या कामगारांना प्रती उंदीर ३० रुपये दिले जायचे. दिवसाला कमीत कमी ३० उंदीर मारण्याची अट त्यांना होती. त्यानंतर त्यांची हजेरी लागायची. त्यामुळं या चित्रपटाचं शीर्षक 'हजेरी' असं आहे.


प्रेमकथेसोबत जीवनगाथा

या चित्रपटात मंगेशनं साकारलेल्या उंदीर मारणाऱ्या तरुणाची प्रेमकथा आणि त्याअनुषंगानं जीवनाची गाथा मांडण्यात आली आहे. 'स सासूचा' तसंच 'येडा' या वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक किशोर बेळेकर यानं 'हजेरी'चं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात मंगेशची जोडी मराठी चित्रपट-मालिका विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जमली आहे. याखेरीज मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांची भली मोठी फौज या चित्रपटात 'हजेरी' लावणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून, सध्या डबिंगचं काम वेगात सुरू आहे. पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झाल्यावर झी टॅाकिजतर्फे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये कधी 'हजेरी' लावणार त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.हेही वाचा  -

पूर्वीच्या ‘अंतर्नाद’मधील ‘भज गणपती’

आठ वर्षांनी संजय-अजय पुन्हा एकत्रसंबंधित विषय
ताज्या बातम्या