Advertisement

सुखाचा शोध घेत हाॅलिवूडला निघाला मराठी सिनेमा

आजवर काही दृश्यं किंवा गाण्यांसाठी परदेशात जाणाऱ्या मराठी सिनेमांचं संपूर्ण चित्रीकरण आता विदेशात होऊ लागलं आहे. त्याच वाटेनं जात लॅास एंजेलिसमध्ये चित्रीत केल्या जाणाऱ्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या सिनेमाचा मुहूर्त मुंबईत करण्यात आला आहे.

सुखाचा शोध घेत हाॅलिवूडला निघाला मराठी सिनेमा
SHARES

मागील काही वर्षांपासून मराठी सिनेमांचं बजेटही हिंदी आणि दक्षिणात्य सिनेमांसारखं वाढलं आहे. मराठीतही दर्जेदार निर्मितीमूल्यांनी सज्ज असलेल्या सिनेमांची निर्मिती केली जात आहे. आजवर काही दृश्यं किंवा गाण्यांसाठी परदेशात जाणाऱ्या मराठी सिनेमांचं संपूर्ण चित्रीकरण आता विदेशात होऊ लागलं आहे. त्याच वाटेनं जात लॅास एंजेलिसमध्ये चित्रीत केल्या जाणाऱ्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या सिनेमाचा मुहूर्त मुंबईत करण्यात आला आहे.


अमेरिकेत घडणारं कथानक

प्रत्येकाची सुखाची परिभाषा वेगवेगळी असते. सुख मिळवण्यासाठी आपण आपला प्रत्येक क्षण वेचत असतो आपापल्या परीनं सुखी राहण्याचा मार्ग शोधत असतो. याच सुखाचा शोध आता सिनेमाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. नेहमीच वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे आता सिनेमाच्या माध्यमातून सुखाची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचं शीर्षकच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' हे आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या चित्रपटात अमेरिकेत घडणारं कथानक पाहायला मिळणार आहे.


पहिला मराठी चित्रपट

साईबाबा स्टुडिओज आणि समृद्धी सिनेवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमानं 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे चित्रित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं कलाक्षेत्राला चांगल्या कथेचा सुखाचा ठेवा देण्यासाठी निर्माते शिवकुमार आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे एकत्र आले आहेत. छोट्या पडद्यावर अनेक दर्जेदार शोज देणारे निर्माते–दिग्दर्शक गजेंद्र सिंग या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.


अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत

या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असून, झीनल कामदार या नवोदित अभिनेत्रीसोबत त्याची जोडी जमली आहे. या सिनेमातील इतर कलाकारांची नावं अद्याप रिव्हील करण्यात आलेली नाहीत. लॉस एंजलिस स्थित फाईव्ह डायमेंशन्स एंटरटेन्मेंट ही कंपनी या चित्रपटाची लाईन प्रोड्यूसर म्हणून काम पहाणार आहे. स्वरूप भालवणकर या सिनेमाला संगीत देणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस या सिनेमातील कलाकारांची टिम चित्रीकरणासाठी लॅास एंजलिसच्या दिशेने उड्डाण करणार आहे.



हेही वाचा -

‘वुमन्स डे’ला डिजीटल इन्फ्लुएन्सर्स कॉनक्लेव्हमध्ये सई

‘तेजाज्ञा’च्या अॅडला ‘वुमन्स डे’चा मुहूर्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा