Advertisement

‘दिनकर संभाजी चव्हाण’ म्हणतो, “आता बस्स”


‘दिनकर संभाजी चव्हाण’ म्हणतो, “आता बस्स”
SHARES

सर्वसामान्य माणूस आज किती यातना भोगतोय ते वेगळं सांगण्याची गरज नाही. सरकारं बदलतात, पण कॅामनमॅनचं कोणीच भलं करत नाहीत. अशाच वैतागलेल्या कॅामनमॅनचा लढा दिग्दर्शक शिरीष राणेने ‘आता बस्स’ या सिनेमात मांडला आहे

माणसासारखंच सिनेमांचंही आपलं नशीब असतं. त्यामुळेच काही सिनेमे अल्पावधीत तयार होऊन प्रदर्शित होतात. पण काही अडथळ्यांच्या चक्रव्यूहात अडकतात. काही त्यातच बंद पडतात. पण काही मात्र येणाऱ्या प्रत्येक संकटाचा धीरोदात्तपणे सामना करत रसिक दरबारी हजेरी लावतातच. ‘आता बस्स’ हा शिरीष राणे दिग्दर्शित असाच एक सिनेमा आहे, जो वास्तव दर्शवणारा आहे. ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना शिरीषने ‘आता बस्स’च्या निमित्ताने समोर आलेल्या अडचणींसोबतच इतरही माहितीही शेअर केली.


‘जन्म’ नंतर ‘आता बस्स’

रीमा लागू आणि वीणा जामकर यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘जन्म’ या सिनेमानंतर दिग्दर्शक शिरीष राणेने ‘आई गं’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं. पण तो प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचू शकला नाही. त्यानंतर रीतसर प्रदर्शित होणारा ‘आता बस्स’ हा शिरीषचा दुसरा सिनेमा आहे.


पूर्वीचा ‘दिनकर संभाजी चव्हाण’

या सिनेमाच्या नावात ट्वीस्ट आहे. याबाबत शिरीष म्हणाला की, चित्रीकरण सुरू झालं तेव्हा या सिनेमाचं शीर्षक ‘दिनकर संभाजी चव्हाण’ होतं. चित्रीकरण आणि पोस्ट प्रोडक्शन पूर्ण झाल्यानंतरही काही तांत्रिक कारणांमुळे हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही. खरं तर ‘दिनकर संभाजी चव्हाण’ हे शीर्षक सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखेवर आधारित होतं. पण आता ते बदलण्यात आलं आहे.


कोण आहे दिनकर?

दिनकर चव्हाण हा एक सर्वसामान्य माणूस आहे. सद्य परिस्थितीला कंटाळलेला, वैतागलेला, सिस्टीमविषयी मनात चीड असूनही हतबल झालेला, मुंबईतून बाहेर उपनगरात फेकलेला, वेळोवेळी समाजव्यवस्थेचा बळी ठरणारा असा हा एक कॅामनमॅन आहे.


‘आता बस्स’ कोणाला म्हणतोय?

हा कॅामनमॅनच सरकारला, व्यवस्थेला आणि एकूणच आज उद्भवलेल्या परिस्थितीला ‘आता बस्स’ म्हणतोय. तुमचं आम्ही खूप सहन केलं ‘आता बस्स’... यापुढे सहन करणार नाही, असं म्हणत सिस्टिमला त्याने विचारलेले प्रश्न आणि त्याचा झालेला परिणाम या सिनेमात आहे. त्याच्या माध्यमातून प्रत्येक मुंबईकराचा सुरू असलेला लढा ‘आता बस्स’मध्ये मांडण्यात आला आहे.


सयाजी-मनोजची जुगलबंदी

या सिनेमात मनोज जोशीने दिनकर संभाजी चव्हाण या कॅामनमॅनची भूमिका साकारली आहे. तर सयाजी शिंदे भ्रष्ट पुढाऱ्याच्या भूमिकेत आहे. दोन्ही तगडे कलाकार तितक्याच तोलामोलाच्या भूमिकांमध्ये असल्याने मनोज-सयाजी यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल. याशिवाय विक्रम गोखले, डॅा. विलास उजवणे, अनंत जोग, अनंत महादेवन, मुक्ता बर्वे, निशा परुळेकर, प्रमोद पवार, संजय मोने, संजय कुलकर्णी आदी कलाकारही आहेत.


संतोष-सुशांत-सुनीलचं आंदोलन

या सिनेमात एक गाणं आहे, ज्यात मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलावंत आहेत. ‘आता बस्स...’ हे शीर्षक गीत प्रामुख्याने संतोष जुवेकरवर चित्रीत करण्यात आलं असून, त्याला सुनील बर्वे, सुशांत शेलार, अभिजीत पानसे, पुष्कर श्रोत्री, विद्याधर जोशी, प्रदीप पटवर्धन, संदीप कोचर आदी कलाकारांची साथ लाभली आहे.


नाटकावर आधारित

या सिनेमाची कथा आनंद म्हसवेकरांच्या ‘चॅाईस इज युवर्स’ या नाटकावर आधारित आहे. पटकथा-संवाद शिरीष आणि योगेश गवस यांनी लिहिले आहेत. ५ आॅक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची निर्मिती संदीप पाटील, अॅड. पंडीत राठोड आणि मेहमूद अली यांनी केली आहे.हेही वाचा - 

सनीच्या सिनेमाला वाढदिवसाचा मुहूर्त

दिग्दर्शनाचा डेब्यू अन् सिनेमाची हॅटट्रीक!
संबंधित विषय
Advertisement