दिग्दर्शक समित कक्कडच्या 'हाफ तिकीट' या मराठी चित्रपटानं देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत विविध पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. आता 'हाफ तिकीट' हा चित्रपट चीनमध्येही प्रदर्शित होणार आहे.
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लहानग्यांच्या भावविश्वाचा कॅनव्हास रेखाटणाऱ्या 'हाफ तिकीट'नं अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव मोठ्या दिमाखात कोरलं आहे. आता आणखी एक मानाचा तुरा 'हाफ तिकीट'च्या शिरपेचात रोवला जाणार आहे. 'हाफ तिकीट' लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा 'हाफ तिकीट' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला हे विशेष. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून, त्याला चिनी सबटायटल्सची जोड देण्यात आली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दाक्षिणात्य चित्रपट 'काक मुत्ताई'चा मराठी रिमेक असलेल्या 'हाफ तिकीट'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला विविध चित्रपट महोत्सवांमधून केवळ नावाजलेच गेले नाही तर अनेक पुरस्कारही मिळाले. दोन भावांच्या जिद्दीची त्यांच्या संघर्षाची ही गोष्ट क्षणिक भौतिक सुखांचा मागोवा घेते. शुभम मोरे, विनायक पोतदार या दोन बालकलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाला भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदी दिग्गज कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे.
व्हिडिओ पॅलेसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं चीनसारखी मोठी बाजारपेठ आता मराठी चित्रपटांसाठीसुद्धा खुली असल्याचं सांगताना खूप आनंद होत असल्याची भावना निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी व्यक्त केली आहे. 'हाफ तिकीट' हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणं हा संपूर्ण टीमसाठी सुवर्ण क्षण असून, मराठी चित्रपट आज जागतिक स्तरांपर्यंत पोहोचत असल्याचं पाहून खूप आनंद होत असल्याचं म्हणत समितनं आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा -
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना जुहूच्या हॉटेलमधून अटक
रेल्वेमध्ये खिसे कापूंचा सुळसुळाट, ३ महिन्यात ५ हजार ९०८ तक्रारी