Advertisement

‘मुंबई पुणे मुंबई ३’ची ३ दिवसांत ५ कोटींची कमाई!


‘मुंबई पुणे मुंबई ३’ची ३ दिवसांत ५ कोटींची कमाई!
SHARES

एखादा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला की त्याचे पुढील भाग पाहण्यासाठी त्यांची पावलं आपोआप चित्रपटगृहांकडे वळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागानंतर ‘मुंबई पुणे मुंबई’च्या तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पहिल्या ३ दिवसांमध्ये ५ कोटींची कमाई करत या चित्रपटाने त्याचा पुरावाच दिला आहे.

‘मुंबई पुणे मुंबई-३’ हा चित्रपट महाराष्ट्रात शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने ३ दिवसांत ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भागसुद्धा सिनेरसिकांनी डोक्यावर घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेच्या या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरी यांच्या आयुष्यात पुढे काय घडतं, हे पाहण्यासाठी रसिक गर्दी करत आहेत. दमदार कथानक, कलाकारांचा कसदार अभिनय, उच्च निर्मितीमूल्ये यामुळे ‘मुंबई पुणे मुंबई-३’ चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे.


‘मुंबई पुणे मुंबई ३’ने पहिल्या ३ दिवसांमध्ये मिळवलेल्या यशाबाबत सतीश म्हणाला की, ''सर्वप्रथम मी सिनेरसिकांचे आभार मानतो. त्यांचा प्रतिसाद आणि प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत मजल मारली आहे. आशय चांगला असेल तर मराठी प्रेक्षक चित्रपट उचलून धरतो. हिंदी चित्रपटांपेक्षा आज आपण सरस ठरलो आहोत, याचं कारण हेच आहे. यशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी सर्व निर्मात्यांनी एकत्र आलं पाहिजे. चित्रपटांच्या तारखा क्लॅश होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.'' हा मोलाचा सल्ला द्यायलाही सतीश विसरला नाही.

तिसऱ्या भागाची निर्मिती करणारा ‘मुंबई पुणे मुंबई’ ३ हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. मराठीतील आघाडीची जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे सलग तिसऱ्यांदा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबरोबर एकत्र आले आहेत. यात रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. ‘मुंबई पुणे मुंबई-३’ची कथा पल्लवी राजवाडे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अश्विनी शेंडे आणि पल्लवी राजवाडे यांचे आहेत.



हेही वाचा-

Review: 'मुंबई पुणे मुंबई ३'- प्रसुतीच्या सुखद कळा!

प्रिया-उमेशची गोड बातमी काय?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा