Advertisement

Movie Review : विक्षिप्त विचारसरणी विरोधातील न्यायालयीन लढा

आज जरी मुलींना बऱ्यापैकी मुलांप्रमाणे वागणूक देत मुलगाच हवा हा अट्टाहास धरला जात नसला तरी काही ठिकाणी मात्र हे चित्र बदललेलं नाही. हा चित्रपट त्याचीच जाणीव करून देतो.

Movie Review : विक्षिप्त विचारसरणी विरोधातील न्यायालयीन लढा
SHARES

आजच्या सुधारलेल्या समाजातही विक्षिप्त मनोवृत्ती कायम असल्याची बरीच उदाहरणं दैनंदिन जीवनात पहायला मिळतात. नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या कथेवर आधारीत असलेला 'जजमेंट' हा चित्रपटही समाजाला घातक असलेल्या त्याच विक्षिप्त मनोवृत्तीचं दर्शन घडवतो. पदाचा गैरवापर करत कित्येक गुन्हेगार ताठ मानेनं जगात वावरत असतात. अन्याय झालेली व्यक्ती मात्र खाली मानेनं जीवन जगत असते. एक दिवस मात्र या अन्यायाला वाचा फुटते आणि एक असं 'जजमेंट' दिलं जातं, जे इतिहासात दडलेल्या एका गुन्ह्याचाही पर्दाफाश करतं.


आज जरी कितीही कायदे बनले तरी 'मुलगी नको, मुलगाच हवा' हा विचार मात्र समाजमनावरून मुळापासून पुसण्यात अपयश आलेलं आहे. याच कारणावरून देशाच्या एखाद्या कोपऱ्यात स्त्रीवर अत्याचार होत असतो, पण जेव्हा एखादी स्त्रीच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कंबर कसते तेव्हा मात्र गुन्हेगाराला पळता भुयी थोडी होते. दिग्दर्शक समीर सुर्वेनं या चित्रपटात अशाच प्रकारची कथा सादर केली आहे. मंगेश कुलकर्णी आणि तेजश्री प्रधान या प्रमुख कलाकारांच्या अफलातून अभिनयानं त्याला अचूक न्यायही दिला आहे.


या चित्रपटाची कथा आहे अग्निवेष साटम (मंगेश देसाई)या आयएएस आॅफिसरची. रत्नागिरीमध्ये राहणाऱ्या अग्निवेषला ऋजुता आणि अनाहिता या दोन लहान मुली असतात. मुलींचा तिटकारा असलेल्या अग्निवेषला मुलगा हवा असतो. त्यामुळं लहानसहान कारणांवरून पत्नीला बेदम मारहाण करत असतो. दोन मुलींच्या पाठीवर पत्नीला पुन्हा दिवस गेल्याने अग्निवेषला मुलगा होण्याची अपेक्षा असते. तसं तो पत्नीला बजावतोही. ती देखील मुलगाच होईल असं सांगते, पण एक दिवस त्याला सत्य समजतं. रागाच्या भरात अग्निवेष पत्नीची हत्या करतो. हे सर्व सहा वर्षांची ऋजुता पहाते.

पत्नीच्या मृत्यूनंतर अग्निवेषचे सासरे (माधव अध्यंकर) ऋजुता आणि अनुराधाला आपल्या घरी नेतात. स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेल्या आईच्या हत्येचं शल्य मनात घेऊन ऋतुजा मोठी (तेजश्री प्रधान) होते. ऋजुता लॅाचं शिक्षण पूर्ण करते, तर अनाहिता (शलाका आपटे) मानसोपचारतज्ज्ञ बनते. १५ वर्षे होऊनही ऋजुताच्या मनातून आईच्या हत्येची गोष्ट पुसली गेलेली नसते. त्यामुळंच आपल्या आईच्या हत्येविरोधात ती स्वत:च्या वडिलांविरोधातच न्यायालयीन लढा पुकारते.

चित्रपटाची वनलाईन आजच्या काळातील अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची जाणीव करून देणारी आहे. आज जरी मुलींना बऱ्यापैकी मुलांप्रमाणे वागणूक देत मुलगाच हवा हा अट्टाहास धरला जात नसला तरी काही ठिकाणी मात्र हे चित्र बदललेलं नाही. हा चित्रपट त्याचीच जाणीव करून देतो. पटकथेची कसदार मांडणी आणि प्रसंगाना साजेसं संवादलेखन या चित्रपटासाठी पोषक वातावरणनिर्मिती करतं. एक संवेदनशील विषय समीरनं अतिशयोक्ती न करता हाताळल्यानं त्यातील गांभीर्य कायम राहतं. चित्रपटाच्या सुरुवातीला असलेली मारहाणीची दृश्ये मनाला चटका लावून जाणारी असली तरी अग्निवेष असा विक्षिप्त का वागतो याचं कारण उत्तरार्धात समजतं.

मध्यंतरापर्यंत न्यायालयीन खटल्यासाठी आवश्यक पार्श्वभूमी तयार केल्यानंतर मध्यंतरानंतर खऱ्या अर्थानं न्यायासाठी लढा सुरू होतो. या दरम्यान पुरावे गोळा करण्यासाठी ऋजुतानं केलेली मेहनत आणि धावपळ मात्र पहायला मिळत नाही. त्यामुळं न्यायालयातील दृश्यानंतर एखादा नार्मल सीन आणि पुन्हा पुढील तारखेचा वाद-विवाद आहे. विशेष म्हणजे कोणत्याही नाटकीय पद्धतीनं चित्रपटाचा शेवट करण्याचा मोह समीरनं टाळला आहे. त्यामुळं चित्रपटातील वास्तववादी चित्र अधिक प्रभावीपणं मनाला भिडतं. ‘तुझ्या सोबतीला…’ हे गाणं चांगलं आहे. पार्श्वसंगीताचा बाजही पटकथेतील गूढ आणखी गडद करतो. नझीर खान यांचं छायांकनही जमेची बाजू आहे.

कारकिर्दीच्या सुरुवातीला विनोदी भूमिका साकारल्यानंतर मागील काही वर्षांपासून गंभीर भूमिकांकडे वळलेल्या मंगेश देसाईनं प्रथमच साकारलेला खलनायक खतरनाक वाटतो. वयागणिक आलेला वागण्या-बोलण्यातील संथपणा मंगेशनं अत्यंत बारकाईनं सादर केला आहे. तेजश्री प्रधानच्या आजवरच्या करियरमधील हा सर्वोत्तम परफॅार्मंस आहे. तिनं साकारलेली सुरुवातीला काहीशी घाबरलेली, तरीही आपल्या आईला न्याय देण्यासाठी धजावणारी ऋजुता लक्ष वेधून घेते. महेंद्र तेरेदेसाई यांनी साकारलेले न्यायाधीश मिश्कील असल्यानं कोर्टामध्ये हलकीशी विनोदाची लकेर अनुभवायला मिळते. माधव अभ्यंकर यांनी साकारलेले धास्तावलेले आजोबाही छान जमले आहेत. यासोबतच शलाका आपटे, सतीश सलागरे, शिल्पा गांधी-मोहिले यांनीही चांगलं काम केलं आहे. प्रतीक देशमुखची छोटीशी भूमिका कथानकाला कलाटणी देणारी आहे.

थोडक्यात हा चित्रपट समाजातील विक्षिप्त विचारसरणी विरोधात पुकारलेला लढा दर्शवणारा आहे. सशक्त लेखन आणि कलाकारांच्या अभिनयानं हा लढा यशस्वी केल्यानं एकदा तरी नक्कीच पहायला हवा.मराठी चित्रपट : जजमेंट

निर्माता : डॉ. प्रल्हाद खंदारे

पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन : समीर रमेश सुर्वे

कलाकार : मंगेश देसाई, तेजश्री प्रधान, शलाका आपटे, माधव अभ्यंकर, प्रतीक देशमुख, सतीश सलागरे, महेंद्र तेरेदेसाई, शिल्पा गांधी-मोहिले, चित्रा भुजबळ, विजय भानू, किशोरी आंबिये, भावेश चित्रे, संभाजी सावंत, नुमायारा खान, निलेश देशपांडे, सागर गुंजाळ, गंधर्व पेडणेकर, संगीता पाटील, किशोर कोठावदेहेही वाचा -

'तुमच्या समर्थकांशी कसं वागायचं’, अनुराग कश्यपनं विचारला मोदींना प्रश्न

सुमितनं गायलं बंगाली शैलीतील मराठी गाणं
संबंधित विषय
Advertisement