Advertisement

सुमितनं गायलं बंगाली शैलीतील मराठी गाणं

मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांमध्येही अभिनय करणाऱ्या सुमितनं संगीत नाटकातही काम केलं आहे. मात्र पहिल्यांदाच त्यानं चित्रपटासाठी गाणं गायलं आहे.

सुमितनं गायलं बंगाली शैलीतील मराठी गाणं
SHARES

मराठीसह हिंदीतही आघाडीच्या कलाकारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा सुमित राघवन हा एक बहुगुणी कलाकार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. गायनाचंही अंग असलेल्या सुमितनं आता चित्रपटासाठी एक अनोखं गीत गायलं आहे.


राधे राधे...

सुमित हा उत्तम अभिनेता आहेच, पण त्यासोबतच गाण्याची समज असलेला तो एक चांगला गायक आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच मालिका आणि नाटकांमध्येही अभिनय करणाऱ्या सुमितनं संगीत नाटकातही काम केलं आहे. मात्र पहिल्यांदाच त्यानं चित्रपटासाठी गाणं गायलं आहे. 'वेलकम होम' या चित्रपटात सुमितनं 'राधे राधे...' हे गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे बंगाली शैलीत असलेलं गाणं सुमितनं कोणत्याही वाद्यांच्या कोलाहालाविना गायलं आहे. 


गाण्याची दोन व्हर्जन्स 

प्रथमच चित्रपटासाठी गायन करताना बंगाली शैलीतील एक अनोखं गाणं गायला मिळाल्याबाबत सुमित म्हणाला की, या चित्रपटात गाण्याची दोन व्हर्जन्स आहेत. त्यातलं एक व्हर्जन मी गायलं आहे. अत्यंत श्रवणीय असं हे गाणं आहे. गाण्याचं दुसरं व्हर्जन चित्रपटात पार्श्वगीत म्हणून येतं. या गाण्यामुळं पहिल्यांदाच चित्रपटात गाणं गाता आलं. यापूर्वी नाटकात वगैरे गाणं गायलं असल्यानं गायनाचा अनुभव होता. त्यामुळं फारशी अडचण आली नाही. दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटात मला अभिनयासोबतच गाणं गाता आलं याचा विशेष आनंद आहे.


सुरेश नावाची व्यक्तिरेखा

'वेलकम होम'मधील आपल्या भूमिकेबाबत सुमित म्हणाला की, या चित्रपटात मी सुरेश नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. खूप छान प्रकारे ही व्यक्तिरेखा लिहिली गेली आहे. त्यामुळं ती पडद्यावर सादर करणं फार सोपं गेलं. एका दिवसात घडणारी ही गोष्ट आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांच्यासह, मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर यांच्यासारख्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली त्यामुळं हा चित्रपट खूप छान अनुभव देणारा ठरल्याचं सुमितचं मत आहे.


१४ जूनला प्रदर्शित

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयींनी दिग्दर्शित केलेला 'वेलकम होम' हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सुमितसोबत मृणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असून, त्यांच्या जोडीला स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ. मोहन आगाशे, प्रसाद ओक,  उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम स्टारकास्ट आहे. 


 लेखन सुमित्रा भावेंचं

दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखनही सुमित्रा भावे यांनी केलं आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केलं आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. 

https://youtu.be/9l-qa928M7cहेही वाचा -

EXCLUSIVE : प्रियाला पुन्हा लागले रंगभूमीचे वेध

भन्साळींसाठी समीर पुन्हा बनला राजकारणी
संबंधित विषय
Advertisement