Advertisement

Movie Review : 'ति'ने स्वत:साठी घेतलेल्या 'एका निर्णया'ची कथा

काही सिनेमे खूप बोलतात, पण काहीच सांगत नाहीत. काही फार कमी बोलतात, पण बरंच काही सांगून जातात. पण 'एक निर्णय - स्वत:चा स्वत:साठी' हा सिनेमा मात्र खूप बोलतोही आणि बरंच काही सांगतोही.

Movie Review : 'ति'ने स्वत:साठी घेतलेल्या 'एका निर्णया'ची कथा
SHARES

काही सिनेमे खूप बोलतात, पण काहीच सांगत नाहीत. काही फार कमी बोलतात, पण बरंच काही सांगून जातात. पण 'एक निर्णय - स्वत:चा स्वत:साठी' हा सिनेमा मात्र खूप बोलतोही आणि बरंच काही सांगतोही. आजवर केवळ अभिनय करणाऱ्या श्रीरंग देशमुख यांनी प्रथमच दिग्दर्शन करताना या सिनेमाचं लेखन आणि निर्मितीही केली आहे. मातृत्व या मुद्द्यावर त्यांनी काहीशा वेगळ्या शैलीत भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

जीवन आणि निर्णय यांचं अतूट नातं आहे. आयुष्यातील प्रत्येक वळणावर सर्वांनाचा कोणत्या ना कोणत्या निर्णय प्रक्रियेतून जावं लागतं. यापैकी बऱ्याच निर्णयांमध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो, पण जेव्हा एखाद्या विवाहित स्त्रीवर निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा तिच्यासमोर कशा प्रकारची परिस्थिती उभी ठाकते. त्यानंतर नियती तिच्याशी कशा प्रकारे खेळ खेळते त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.


नाती आणि भावनांचा गुंता

या सिनेमाची कथा सुबोध भावेने साकारलेल्या डॅाक्टर ईशानभोवती गुंफली आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच ईशान आणि मानसी यांचा विवाह होतो. आई-वडीलांच्या पश्चात मामा आणि थोरल्या बहिणीने वाढवलेल्या मानसीला सासरच्या रूपात जणू माहेरच मिळतं. दोघांच्या संसारात नवीन पाहुणा येणार असतो, पण मानसीचं मिसकॅरेज होतं. मानसीला कधीही मूल होणार नसल्याचं रिपोर्टवरून समजतं. या सिनेमात ईशानच्या ट्रॅकसोबतच कार्डिओलॅाजिस्ट मुक्ता भांडारकरचाही ट्रॅक आहे. मुक्ता रुग्णांची सेवा करण्यात मग्न असते आणि अचानक विमान अपघातात तिच्या आई-वडीलांचं निधन होतं. मुक्ता एकटी पडते. मानसिकदृष्ट्या खचल्याने तिच्या रुग्णसेवेच्या व्रतात अडथळा निर्माण होतो. त्यानंतर ईशान आणि मुक्तामध्ये असलेलं नातं समोर येतं. ते नातं कोणतं ? त्यानंतर निर्माण झालेला नाती व भावनांचा गुंता कशाप्रकारे सोडवला जातो ते या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.


गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न

लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या श्रीरंग देशमुख यांनी या सिनेमाला आणि त्यातील विषयाला थोडी वेगळी ट्रीटमेंट दिल्याचं जाणवतं. मातृत्वावर आधारित असलेले बरेच सिनेमे यापूर्वी आले असले तरी देशमुख यांनी मानवी नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून एक गंभीर विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमा सुरू झाल्यापासून कथानक वेगात पुढे सरकतं, पण नंतर एका विशिष्ट टप्प्यावर सिनेमाची गती मंदावते, ती शेवटपर्यंत तशीच राहते. सुरुवातीपासूनच प्रत्येक कॅरेक्टर खूप बोलतं, पण त्यातून सिनेमाचा विषय नेमका काय हे समजत नाही.


मध्यंतरानंतर वाढते उत्सुकता

मध्यंतरापूर्वी ईशान आणि मुक्ता यांच्या नात्यातील रहस्य उलगडू न देण्याचं काम देशमुख यांनी यशस्वीपणे केलं आहे. त्यामुळे मध्यंतरानंतर काय घडणार याबाबत उत्सुकता लागते. मातृत्वात बाधा येणं, सरोगसी, स्पर्म बेबी हे विषय यापूर्वी जरी आले असले तरी या चित्रपटात एका स्त्रीने स्वत: स्वत:साठी घेतलेल्या निर्णयावर भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं मत आणि विश्लेषण यात बराच वेळ गेला आहे. त्यामुळे कथेच्या मानाने सिनेमाची लांबी थोडी वाढल्यासारखी वाटते. 'हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला...' हे गाणं स्मरणात राहतं. यासोबतच वैभव जोशींनी लिहिलेल्या कविताही अर्थपूर्ण आहेत. कॅमेरावर्क, पार्श्वसंगीत, कला दिग्दर्शन या तांत्रिक बाजू चांगल्या आहेत.


मुक्ता मनाला भावते

द्विधा मन:स्थितीत अडकलेला नवरा साकारताना सुबोध भावेने पुन्हा एकदा छान काम केलं आहे. बऱ्याच दिवसांनी मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या मधुरा वेलणकरने साकारलेली निर्णयक्षम मुक्ता मनाला भावते. कुंजिका काळविंट या नवोदित अभिनेत्रीनेही मानसीची भूमिका यशस्वीपणे साकारली आहे. राजामामाच्या भूमिकेत शरद पोंक्षे यांनी तर ईशानच्या आईच्या भूमिकेत सुहास जोशी यांनीही चांगलं काम केलं आहे. यासोबतच विक्रम गोखले, मंगल केंकरे, श्रीरंग देशमुख, मुग्धा गोडबोले, सीमा देशमुख यांनीही सहाय्यक व्यक्तिरेखांमध्ये छान साथ केली आहे.

हा एक वैचारिक सिनेमा आहे. त्यामुळे मसालेपटांच्या चाहत्यांना हा आवडणार नाही. पण एका ध्येयवेड्या स्त्रीने स्वत:साठी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आणि नियतीचा खेळ अनुभवायचा असेल तर हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

दर्जा : ***

............................................

लेखन, निर्मिती व दिग्दर्शन : श्रीरंग देशमुख

कलाकार : सुबोध भावे, मधुरा वेलणकर, कुंजिका काळविंट, शरद पोंक्षे, सुहास जोशी, विक्रम गोखले, मंगल केंकरे, श्रीरंग देशमुख, मुग्धा गोडबोले, सीमा देशमुख, मोहक मटकर, परी सावंत, स्वप्नाली पाटील, सुरभी फडणीस, प्रतिभा दाते


हेही वाचा - 

आणि जितेंद्रने केला ‘कोपचा’ डान्स!

मराठीमध्ये 'साइज झिरो' हिरोइनची एंट्री!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा