Advertisement

मोठ्या पडद्याकडं वळली साईंकितची पावलं

'मिरांडा हाऊस' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे साईंकित मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. शीर्षकावरूनच हा रहस्यमय चित्रपट असणार याची जाणीव होते. त्यामुळं या चित्रपटात साईंकितची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मोठ्या पडद्याकडं वळली साईंकितची पावलं
SHARES

छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना कायम मोठ्या पडद्यावर चमकण्याचे वेध लागलेले असतात. एखादी चांगली स्क्रीप्ट आली की मग या कलाकारांचं रुपेरी पडद्यावर झळकण्याचं स्वप्न साकार होतं. आजवर नाटक आणि मालिकांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या साईंकित कामतची पावलंही मोठ्या पडद्याच्या दिशेनं वळली आहेत.


मोठ्या पडद्याकडं झेप 

साईंकितला तुम्ही यापूर्वी झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या पहिल्या पर्वात अभिरामच्या भूमिकेत पाहिलं असेल. त्यासोबतच 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेत समीर या मुख्य व्यक्तिरेखेतही साईंकित झळकला आहे. याशिवाय 'या गोजिरवाण्या घरात' या नाटकाच्या माध्यमातून तो मराठी रंगभूमीवर मिहीर म्हणूनही वावरला आहे. आजवर मालिका आणि रंगभूमीवर काम केलेल्या साईंकितनं आता मोठ्या पडद्याच्या दिशेनं झेप घेतली आहे.


रहस्यमय चित्रपट 

'मिरांडा हाऊस' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे साईंकित मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. शीर्षकावरूनच हा रहस्यमय चित्रपट असणार याची जाणीव होते. त्यामुळं या चित्रपटात साईंकितची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. साईंकितनं आजवर सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळं या भूमिकेतूनही त्याचं वेगळेपण प्रेक्षकांसमोर येणार, यात शंका नाही. 


१९ एप्रिलला प्रदर्शित 

'मिरांडा हाऊस' या चित्रपटात साईंकितसोबत पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'मिरांडा हाऊस'च्या निमित्तानं मिलिंद गुणाजीसुद्धा बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 'अ रेनी डे', 'सावरिया डॅाट कॉम' आणि 'सावली' असे वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शक राजेंद्र तलाक यांनी 'मिरांडा हाऊस'चं दिग्दर्शन केलं आहे. आयरिस प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा  -

पानिपतच्या लढाईनंतरचं सत्य सांगणार 'बलोच'!

प्रसिद्ध चंदन थिएटर दुरुस्तीसाठी बंद, ३ वर्षांनंतर होणार सुरू
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा