Advertisement

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!

'कागर'सारख्या महत्त्वपूर्ण सिनेमात रिंकूसोबत काम करायला मिळणं हा शुभंकरसाठी खूप मोठा ब्रेक आहे. या सिनेमात राजकारणासोबत प्रेमकथा आणि इतरही विषय हाताळण्यात आल्याचं समजतं. या सिनेमावर मागील वर्षभरापासून वेगात काम सुरू आहे.

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!
SHARES

रिंकू राजगुरूचा 'कागर' या आगामी चित्रपटातील लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. पण या सिनेमात रिंकूचा नायक कोण? ते मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. 'मुंबई लाइव्ह'ला मात्र रिंकूच्या नायकाचं नाव समजलं आहे. अभिनेते सुनील तावडे यांचा चिरंजीव शुभंकर 'कागर'मध्ये रिंकूचा हिरो बनला असल्याची ही ब्रेकिंग न्यूज खास आमच्या वाचकांसाठी...


नवी कोरी जोडी

पदार्पणातील 'सैराट' या सिनेमात नवोदित आकाश ठोसरसोबत जोडी जमवलेली रिंकू 'कागर'मध्ये कोणासोबत दिसणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. 'मुंबई लाइव्ह'ला मात्र फार पूर्वीच याबाबतचे संकेत मिळाले होते. 'मुंबई लाइव्ह'ला मिळालेल्या एक्सक्लुझीव्ह माहितीनुसार 'कागर'मध्ये रिंकू राजगुरू आणि शुभंकर तावडे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं रिंकू आणि शुभंकर प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचं सूत्रांकडून समजतं. 'कागर'च्या टिमच्या वतीनं मात्र अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


मकरंद मानेंचं दिग्दर्शन

'रिंगण' सिनेमासाठी राष्ट्रीय पारितोषिक पटकावणाऱ्या मकरंद मानेनं 'कागर'चं दिग्दर्शन केलं आहे. केवळ मकरंदच नव्हे, तर इतर कलाकारांकडूनही 'कागर'बाबत कमालीची गुप्तता राखण्यात येत आहे. वायोकॅाम १८ची प्रस्तुती असल्यानं त्यांच्या योजनेनुसारच टप्प्याटप्प्यानं 'कागर'बाबतची माहिती रिव्हील केली जाणार आहे. असं असलं तरी या सिनेमात रिंकूची जोडी शुभंकरसोबतच जमल्याची सूत्रांची माहिती शंभर टक्के खरी आहे. 'सैराट'नंतर रिंकूसाठी जसा हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे, तसा शुभंकरसाठीही आहे.


फ्रेशर्स' द्वारे मालिकाविश्वात

शुभंकरबाबत सांगायचं तर जवळजवळ चार महिन्यांपूर्वी रंगभूमीवर नव्या संचात आलेल्या 'नटसम्राट' या नाटकात त्यानं राजा ही व्यक्तिरेखा साकारली होती. या नाटकात मोहन जोशी आप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत आहेत. रुईया कॅालेजमधून बी. कॅाम. पूर्ण केल्यावर शुभंकरनं साहित्य संघातील ड्रामा स्कूलमध्ये वर्षभर अभिनयाचे धडे गिरवले. 'फ्रेशर्स' या मालिकेद्वारे तो मालिकाविश्वात आला. यात त्यानं साकारलेला संग्राम पाटील चांगलाच गाजला. याखेरीज ऋषिकेश जोशीच्या 'गर्व निर्वाण' या नाटकातील त्याचं नृसिंह तांडव रसिकांना खूप भावलं. सिनेमाबाबत सांगायचं तर समीर विद्वांसच्या 'डबल सीट'मध्ये शुभंकरनं अंकुश चौधरीच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली आहे.


चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यात

'कागर'सारख्या महत्त्वपूर्ण सिनेमात रिंकूसोबत काम करायला मिळणं हा शुभंकरसाठी खूप मोठा ब्रेक आहे. या सिनेमात राजकारणासोबत प्रेमकथा आणि इतरही विषय हाताळण्यात आल्याचं समजतं. या सिनेमावर मागील वर्षभरापासून वेगात काम सुरू आहे. रिंकू बारावीला असल्यानं मध्यंतरी या कामाला थोडा ब्रेक लागला होता. आता ती बारावीच्या टेन्शनमधून मुक्त झाल्यानं लवकरच या सिनेमाबाबतच्या अधिकृत घोषणाही करण्यात येतील असं समजतं. या सिनेमाचं चित्रीकरण सोलापूर जिल्ह्यातील अकलूज आणि आसपासच्या गावांमध्ये करण्यात आलं आहे. निर्माते सुधीर कोलते आणि विकास हांडे यांनी उदाहरणार्थच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली आहे. यातील रिंकू-शुभंकरची केमिस्ट्री कशी वर्क होते ते पाहायचं आहे.



हेही वाचा -

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...

पाण्याला सिनेमांची लागली तहान!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा