Advertisement

पाण्याला सिनेमांची लागली तहान!

पाणी टंचाईचं भीषण चित्र रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन मराठी सिनेमे सज्ज झाले आहेत.

पाण्याला सिनेमांची लागली तहान!
SHARES

आज संपूर्ण जगाला पाण्याचा यक्ष प्रश्न भेडसावत आहे. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर जात असल्यानं गाव-खेड्यांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना याची झळ पोहोचत नसली, तरी पाण्याची ही तहान एक ना एक दिवस तिथेही पोहोचेल यात शंका नाही. त्यामुळेच असंख्य विहीरी कोरड्या करणाऱ्या पाण्याला आता आपलं महत्त्व पटवून देण्यासाठी सिनेमांची तहान लागली असावी...


सिनेमातून पाण्याचं महत्त्व

पाणी टंचाईचं भीषण चित्र रुपेरी पडद्यावर दाखवण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क तीन मराठी सिनेमे सज्ज झाले आहेत. संत एकनाथ महाराजांनी 'नाथांच्या घरची उलटीच खूण...' या अभंगामध्ये 'पाण्याला मोठी लागली तहान...' असा उल्लेख केला आहे. एकाच वेळी एकाच विषयावरील तीन चित्रपट बनणं हे जणू पाण्याला सिनेमांची तहान लागल्याचं भासवणारं आहे. त्यामुळेच सिनेमाच्या माध्यमातून पाण्याचं महत्त्व सांगितलं तर कदाचित ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचेल या आशेनं हे तीनही सिनेमे बनल्याची जाणीव होते.


सर्वांचा विषय एक

'पाणी', 'एक होतं पाणी' आणि 'H2O' हे तीन मराठी सिनेमे पाण्याची कथा रुपेरी पडद्याच्या माध्यमातून जगासमोर आणणार आहेत. यापैकी 'पाणी'चं दिग्दर्शन अभिनेता आदिनाथ कोठारेनं केलं आहे, तर रोहन सातघरेनं 'एक होतं पाणी'च्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 'H2O' हा सिनेमा मिलिंद पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. हे तिन्ही सिनेमे जरी वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आपापल्या दृष्टिकोनातून बनवले असले, तरी सर्वांचा विषय एक असणं खूप महत्त्वाचं आहे.


दिग्दर्शनासोबत अभिनयही

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडं वळलेल्या आदिनाथ कोठारेच्या 'पाणी' या सिनेमाचा सध्या सगळीकडे डंका वाजतो आहे. या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स या प्रॅाडक्शन हाऊसमध्ये करण्यात आली आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा, संवाद आणि रंगभूषा अशा सहा विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. दिग्दर्शनासोबतच आदिनाथनं 'पाणी'मध्ये अभिनयही केला आहे. या सिनेमातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञांच्या नावांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचं आदिनाथनं 'मुंबई लाइव्ह' शी अनौपचारीक गप्पा मारताना सांगितलं आहे. या सिनेमाचं पटकथा-संवादलेखन नितीन दीक्षित यांनी केलं आहे. या सिनेमापूर्वी आदिनाथनं दिग्दर्शित केलेला परस्पेक्टीव्ह (दृष्टीकोन) लघुपट बराच गाजला आहे.


पाण्याचं भीषण वास्तव

आशिष निनगुरकरनं लिहिलेल्या 'एक होतं पाणी' या सिनेमातही पाण्याची कहाणी पाहायला मिळणार आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमानं विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती पुरस्कार पटकावला आहे. यासोबतच अंबरनाथ फिल्म फेस्टिवल, नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व अहमदनगर फिल्म फेस्टिवलमध्येही या सिनेमानं आपला ठसा उमटवला आहे. "एक होता राजा, एक होती राणी... उद्या म्हणू नका, एक होतं पाणी..." या टॅगलाईनखाली या सिनेमात पाण्याचं भीषण वास्तव मांडलं आहे. या सिनेमात हंसराज जगताप, अनंत जोग, यतीन कार्येकर, रणजित जोग, उपेंद्र दाते, श्रीया मस्तेकर, चैत्रा भुजबळ, गणेश मयेकर, जयराज नायर, दिपज्योती नाईक, त्रिशा पाटील, आशिष निनगुरकर आदींच्या भूमिका आहेत.


H2O चं  उत्कंठावर्धक पोस्टर

'H2O' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. 'कहाणी थेंबाची' असं म्हणत 'H2O' मध्येही पाण्याचीच कहाणी मांडण्यात आली आहे. 'H2O' म्हणजे सायंटिफीक भाषेतील पाण्याचं सूत्र. पाण्याला वैज्ञानिक भाषेत 'H2O' असं संबोधण्यात येतं. या सिनेमाचं दिग्दर्शन मिलिंद पाटील यांनी केलं आहे. बराच काळ दूरदर्शनसाठी काम केलेल्या मिलिंद यांनी पदार्पणातील सिनेमात पाण्यासारख्या वास्तववादी प्रश्नावर भाष्य करण्याचं धाडस केलं आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये कोरड्या आणि तडे गेलेल्या जमिनीवर पाण्याचे मोजके थेंब दिसतात, ज्यात सिनेमाचं शीर्षक आहे. पोस्टरच्या वरच्या बाजूला कोल्हापूरी चप्पल घातलेले, तर खालच्या बाजूला बूट घातलेल्या व्यक्तींचे पाय दिसतात. यावरून हा सिनेमा दोन भिन्न विचार असलेल्या व्यक्तींवर आधारित असल्याचं जाणवतं. याची निर्मिती सुनिल झवर यांनी केली आहे. या सिनेमात काही नवोदित कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.


प्रदर्शनाच्या तारखा भिन्न

या तीनही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा भिन्न आहेत. आदिनाथचा 'पाणी' आणि आशिषच्या 'एक होतं पाणी'च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. या दोन सिनेमांपूर्वी म्हणजेच १२ एप्रिलला मिलिंद पाटील यांचा 'H2O' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा -

सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मनातील 'महिलाराज'

सुखाचा शोध घेत हाॅलिवूडला निघाला मराठी सिनेमा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा