Advertisement

संदिप कुलकर्णी निर्मात्याच्या भूमिकेत

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं आहे. मात्र, 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटात त्यांनी साकारलेली माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं.

संदिप कुलकर्णी निर्मात्याच्या भूमिकेत
SHARES

एखादा कलाकार जेव्हा निर्माता बनतो, तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. एखादा मातब्बर अभिनेता जेव्हा निर्माता बनण्याचा विचार करतो, तेव्हा तर अपेक्षांची उंची आणखी वाढते. अभिनेते संदिप कुलकर्णीही आता निर्मितीच्या मैदानात उतरले असून, त्यांनी 'डोंबिवली रिटर्न' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


करंबोला क्रिएशन्स

संदिप कुलकर्णींसारख्या मुरलेल्या अभिनेत्याबाबत जास्त काही सांगण्याची गरजच नाही. त्यांनी 'मम्मो', 'इस रात की सुबह नहीं', 'हजार चौरसी की मां', 'शूल', 'ट्रॅफिक सिग्नल' या हिंदी चित्रपटांसोबतच मराठीत 'श्वास', 'डोंबिवली फास्ट', 'साने गुरुजी', 'गैर', 'दुनियादारी' यांसारखे वेगळ्या चित्रपटांमधील वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. समर्थ अभिनयाच्या या शिदोरीच्या बळावरच संदिप यांनी निर्मात्याच्या भूमिकेत समोर येण्याचं धाडस केलं आहे. संदीपने स्वतःची करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली असून, 'डोंबिवली रिटर्न' हा या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट आहे.


उत्तमोत्तम कलाकृतीसाठी सज्ज 

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही संदीपने लक्षणीय काम केलं आहे. मात्र, 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटात त्यांनी साकारलेली माधव आपटे ही भूमिका विशेष गाजली. सर्वसामान्य माणसाचा असामान्य प्रवास या चित्रपटातून समोर आला. समीक्षकांसह प्रेक्षकांनीही या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अभिनेता म्हणून भूमिकेचे कंगोरे उलगडणारे संदीप आता निर्मिती संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम कलाकृती घडवण्यासाठी सज्ज आहेत. आशयसंपन्नतेसह प्रेक्षकांना आवडतील असे चित्रपट निर्मिती संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात निर्माण केले जाणार आहेत. 


सायकोलॉजिकल थ्रिलर

या नव्या प्रवासाबाबत बोलताना संदिप म्हणाले की, मी आणि माझे मित्र महेंद्र अटोले आम्ही दोघांनी मिळून 'करंबोला क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. त्यांना चित्रपटांमध्ये, विशेषतः चांगल्या आशय निर्मितीमध्ये रुची आहे. आम्हा दोघांची आवड सारखीच असल्यानं आम्ही एकत्र येऊन निर्मिती संस्था सुरू केली. 'डोंबिवली रिटर्न' हा आमचा पहिला चित्रपट आहे. 'डोंबिवली रिटर्न' ही आजच्या काळातली, एका मध्यवर्गीय कुटुंबाची, सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. त्याचा पट खूपच मोठा असल्याचंही संदीप यांचं म्हणणं आहे. नवीन वर्षी फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



हेही वाचा - 

वैभवसोबत अमृता-सई निघाल्या 'पॉंडिचेरी'ला...

तिहेरी भूमिकेत झळकणार डाॅ. अमोल कोल्हे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा