पोलीस पत्नींच्या मागण्यांबद्दल सरकार उदासीन

 Fort
पोलीस पत्नींच्या मागण्यांबद्दल सरकार उदासीन

सीएसटी - पोलिसांच्या पत्नी विविध मागण्यांसाठी 32 दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्र कार्यक्रमाच्या अनावरणाला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री भेट घ्यायला येतील, अशी आशा उपोषणकर्त्यांना वाटत होती. मात्र मुख्यमंत्री तेथे फिरकलेच नाहीत. त्यामुळे पोलीस पत्नींचा भ्रमनिरास झाला.

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या अध्यक्षा यशश्री पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पोलीस पत्नींच्या काही मागण्या अशा आहेत -

 • पोलिसांना मतदारसंघ, हक्काची घरं मिळायला हवी. पोलिसाच्या एका मुलाला सेवेत सामावून घेतलं जावं.
 • 2011 आणि नंतरची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुलभ व्हावी.
 • अनुकंपा पोलीस भरती प्रक्रिया लवकर व्हावी.
 • विधवा पोलीस पत्नीस दोन महिन्यांत सर्व सरकारी लाभ मिळावे.
 • सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी.
 • सातवा वेतन आयोग महसूल विभागाप्रमाणे मिळावा.
 • पोलीस आणि कुटुंबीयांना सर्व आजारांवर वैद्यकीय सुविधा बिनशर्त आणि मोफत मिळावी.
 • पोलीस सोसायटीकडून अल्प व्याज दरात गृहकर्ज मिळावं.
 • सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी.
 • पोलीस वेलफेअर फंडातून हुतात्म्यांना मदत मिळावी.
 • पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांंवर कठोर कारवाई करावी.
 • बिनशर्त रजा आणि सिक लिव्हही मिळायला हवी.
 • पुरुष पोलीस अंमलदारांच्या पत्नीच्या प्रसूतीनंतर बालसंगोपन आणि पालकत्व रजा 45 दिवसांची असावी.
Loading Comments