Advertisement

ही पाटीलकी, देशमुखी नाही, हा संविधानाचा विजय, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया

कुणालाही मराठा आरक्षण नको असून फक्त नेत्यांच्या दबावापोटी मराठा कार्यकर्ते आरक्षणासाठी होकार देत होते. मात्र ही पाटीलकी, देशमुखी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानप्रमाणे चालणारा हा देश आहे.

ही पाटीलकी, देशमुखी नाही, हा संविधानाचा विजय, अॅड. गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया
SHARES

कुणालाही मराठा आरक्षण नको असून फक्त नेत्यांच्या दबावापोटी मराठा कार्यकर्ते आरक्षणासाठी होकार देत होते. मात्र ही पाटीलकी, देशमुखी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानप्रमाणे चालणारा हा देश आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा दिलेला निकाल हा संविधानाचा विजय आहे. या विजयाला कुणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत अॅड, गुणरत्न सदावर्ते यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.

मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते लढत होते. न्यायालयाच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील अनेकांनी समर्थन दिलं. परंतु ते भीतीपोटी समोर येऊ शकत नव्हते. त्यांचे धन्यवाद. मराठा आरक्षणासाठी निघालेले ५२ मोर्चे, बीएमडब्ल्यूमधून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांच्या दिल्लीतील बैठका, संजय राऊतांची एंट्री, देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरणे, उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे याविरोधात खुल्या वर्गातील गुणवंतांची आणि संविधानची ही लढाई होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानपीठातील भाषणाचा आणि कलम १४ मधील समानतेच्या हक्काचा आधार घेत मराठा आरक्षणाला कोरोना व्हायरस प्रमाणे अल्ट्रा व्हायरस जाहीर केलं आहे.  

गलिच्छ राजकारण

सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल मान्य केला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला देखील रद्द केलं आहे आणि इंद्रा साहनीच्या निकालाच्या आधारे ७ न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यासही स्पष्ट शब्दांत नकार दिला. १०२व्या घटना दुरूस्ती प्रमाणे या वर्गाला केंद्राच्या यादीत टाकण्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठपुरावा करण्याची मुभा देतानाच मराठा समाज मागास ठरत नाही, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. 

हेही वाचा- मराठा आरक्षण रद्द हे महाविकास आघाडी सरकारचं अपयश- चंद्रकांत पाटील

आरक्षणाच्या चष्म्यातील गलिच्छ राजकारण देशात आणि राज्यात आम्ही होऊ देणार नाही. आमचा खून जरी झाला तरी खुल्या गुणवंतांसाठीची लढाई सुरु राहील. सुप्रिया सुळे, शरद पवार, मराठा संघटना, विश्वास नांगरे पाटील, मराठा पोलीस कर्मचारी-अधिकारी जे कोणी एकत्रित येऊन आमचा जीव घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना आमच्या मृत्यूनंतरही महाराष्ट्र, देश जाब विचारेल, असं खळबळजनक विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केलं.

बीएमडब्ल्यूतून मोर्चे

समाजातून दूर राहिलेत अशी मराठा समाजाची परिस्थिती नाही. आदिवासी, महार, मांग, चांभार, कुणाचं धोतर फाटलंय तर कुणाच्या अंगात शर्ट नाही, समाजातून बहिष्कृत करण्यात आलेल्यांच्या मोर्चाला मोर्चा म्हणतात. पण अंगावर ४ हजारांचा पेहराव घातलेल्या, बीएमडब्ल्यू गाड्यातून जमलेल्या लोकांच्या मोर्चाला मोर्चा म्हणत नाही. अशोक चव्हाणांनी तर आज राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या नांदेड जिल्ह्यात मराठा समाजाने मसल पावरने समाजातील खालच्या स्तरातील लोकांच्या प्रेताला लाकडं मिळू दिलेली नाही. ही दडपशाही चालणार नाही.

कारखाने, बँका ताब्यात तरीही

राज्यातील ७५ टक्के साखर कारखाने तुमच्या मालकीचे, बँका तुमच्या मालकीच्या, ९० ते ९५ टक्के मेडिकल काॅलेज तुमचे आणि आता दडपशाहीच्या जोरावर तुम्ही आरक्षणसुद्धा घेणार? पण ही राजेशाही नाही. ही पाटीलकी, देशमुखी नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानप्रमाणे चालणारा देश आहे. जगाने मान्य केलेलं हे संविधान भेदभाव विरहीत आहे. म्हणूनच विनायक मेटेंची बाजूही न्यायालयाने फेटाळून लावताना ही पंचायत नाही, तर सर्वोच्च न्यायालय आहे, असं खडसावलं. हा संविधानाचा विजय आहे. या विजयाला कोणीही डिवचण्याचा प्रयत्न करु नये, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्यांना खासगीत विचारा कुणालाही आऱक्षण नको असून फक्त दबावापोटी ते सर्वजण होकार देत आहेत. त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेलं राजकारण थांबवावं असा इशारा देखील सदारत्ने यांनी दिला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा