Advertisement

‘हा’ तर मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार…

जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण कायम होत नाही, तोपर्यंत काेणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.

‘हा’ तर मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार…
SHARES

जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये, अशी संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी नोंदवली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिलं आहे. (after stay on maratha reservation maharashtra government should cancel police personnel recruitment demands chhatrapati sambhaji raje)

आपल्या पत्रात त्यांनी आपला राग व्यक्त करताना लिहिलं आहे की, संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे. मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार हे माहिती असूनसुद्धा तुम्ही पोलीस भरती काढली. हे पूर्णत: चुकीचं आहे. मराठा समाजाला एकटं पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना ? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहे.

हेही वाचा - मराठा समाजाला नाराजी व्यक्त करू द्या, अन्यथा… संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मी शासनाला एकच सांगू इच्छितो की, मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे. आणि या लढ्यात सर्व जाती-समूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. माेठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार.

जे आरक्षण मिळालं होतं, त्या प्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत. आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून आरक्षण कायम होत नाही, तोपर्यंत काेणत्याही प्रकारची नोकर भरती काढू नये.

सध्याच्या परिस्थितीत नोकर भरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्याल, अशी अपेक्षा, असं मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे.

त्याआधी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. परंतु पोलीस प्रशासन आंदोलकांना नोटीस बजावून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे, असा इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी विरोधकही सरकारच्या पाठिशी, म्हणाले...


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा