Advertisement

भाजपाचे 'हुशार' नगरसेवक बसणार पहिल्या बाकावर


भाजपाचे 'हुशार' नगरसेवक बसणार पहिल्या बाकावर
SHARES

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा जीव मेटाकुटीस आणण्यासाठी भाजपाकडून रणनिती आखली जात आहे. यासाठी भाजपाने आपल्या काही हुशार, अभ्यासू नरसेवकांची यादी तयार केली असून त्यांना 'प्रमोशन' देत महापालिका सभागृहातील पहिल्या बाकांवर बसवण्यात येणार आहे.


मतदानावेळी उडतो गोंधळ

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ८६ आणि भाजपाचे ८२ सदस्य निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाचे सदस्य दुपटीने वाढल्याने त्यांच्या सदस्यांची आसन व्यवस्थाही विखुरलेली आहे. त्यामुळे मतदान घेताना महापालिका चिटणीस विभागाचा बऱ्याचदा गोंधळ उडतो.

विकास आराखडा मंजुरीच्या वेळेस मेट्रो कारशेडवरील उपसूचना मंजूर करताना भाजपाचे सदस्य संख्येने जास्त असतानाही कमी गणले गेले. तर पोलद्वारे घेतलेल्या मतदानात नगरसेवकांची संख्या जास्त आढळली. त्यामुळे भाजपाने आपल्या सदस्यांना एका रांगेत बसवून सर्व सदस्यांची जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सभागृहात भाजपाच्या प्रत्येक नगरसेवकांची जागा निश्चित केली जाणार असल्याचे सांगितले. जे अभ्यासू आणि हुशार तसेच आक्रमक वृत्तीचे नगरसेवक आहेत, त्यांना पुढील बाकांवर बसवले जाणार आहे. जेणेकरून प्रत्येक विषयावर या सदस्यांना पक्षाची भूमिका मांडून प्रसंगी विरोधकांवर हल्ला चढवण्याची सूचना करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


शिवसेनेला असे का वाटत नाही?

महापालिका सभागृहात शिवसेनेची आक्रमकता वाढण्यासाठी जुन्या आणि अभ्यासू नगरसेवकांना पहिल्या व दुसऱ्या रांगेत बसवले जावेत, अशी सूचना पुढे आली होती.

यामध्ये माजी महापौर विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, मंगेश सातमकर, राजुल पटेल, आशिष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, संजय घाडी, रमाकांत रहाटे, सदानंद परब, अमेय घोले, समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, सुवर्णा कारंजे, माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या नावांचा समावेश होता.

या सदस्यांना पुढे बसवून सेनेला आपली आक्रमकता वाढवता येऊ शकते, परंतु सेनेचे याकडे लक्ष नाही. भाजपाने मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवल्याने भविष्यात सेनेचा निभाव भाजपापुढे लागणे कठीण असल्याचे दिसून येत आहे.



हे देखील वाचा -

मुंबई महापालिकेची 125 वर्ष जुनी चावी तुटली!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा