Advertisement

एकनाथ खडसेंची आमदारकी गोत्यात?

अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन खडसे यांच्या नावाला जोरदार विरोध केल्याने राज्यपालांकडून देखील त्यांच्या नियुक्तीवर फुली मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ खडसेंची आमदारकी गोत्यात?
SHARES

भाजपमधून काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांचं नाव राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत असल्याचं समजत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन खडसे यांच्या नावाला जोरदार विरोध केल्याने राज्यपालांकडून देखील त्यांच्या नियुक्तीवर फुली मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, विधान परिषदेसाठी राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ नावांची शिफारस राज्य सरकारकडून राज्यपालांना पाठवण्यात आली आहे, त्यात एक नावा एकनाथ खडसे यांचं आहे, असं जेव्हा मला माध्यमांमधून कळलं, तेव्हा मी राज्यपालांकडे जाण्याचं ठरवलं. ही अतिशय संतापजनक बाब आहे की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा राजकारणात आणू पाहतेय, त्याविरोधात मी राज्यपालांना अपील लेटर द्यायला गेले होते. त्यांच्यासारखी माणसं पुन्हा राजकारणात आली, तर या भ्रष्टाचाराच्या लढ्याला काहीच अर्थ उरणार नाही. (anjali damania meet maharashtra governor bhagat singh koshyari and oppose eknath khadse for mlc selection)

ते जी भाषा अजूनही वापरताहेत त्याबाबतचं निवेदन आणि इतर कागदपत्र मी राज्यपालांना दिली आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करताना केलेल्या भाषणात बाई दिली नाही, मागे लावली असं वक्तव्य त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अनिल देशमुख यांच्यासमोर केलं. त्याचा निषेध म्हणून मी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना एसएमएस पाठवला. त्यावर शरद पवार यांचा मला फोन आला. खडसेंनी माझं नाव घेतलेलं नाही, असं ते मला म्हणाले. त्यावर इतर कुठल्याही महिलेविषयी असं म्हटलेलं तुम्ही खपवून घेणार का असा प्रश्न मी त्यांना विचारला, तेव्हा मी मुंबईत आल्यावर आपण भेटू असं ते मला म्हणाले.

हेही वाचा- विधान परिषदेवर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरची शिफारस?

त्यानंतरी मी पोलिसांत तक्रार दाखल करूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. उलट यावर कुठलीही कारवाई करता येणार नाही, असं पत्र मला वाकोला पोलिसांनी दिलं. राष्ट्रवादीकडे असलेल्या गृह खात्याकडून जर कारवाई होणार नसेल, तर मी न्यायालयीन लढाई लढण्याचं ठरवलेलं असून त्याआधी राज्यपालांना निवेदन देण्याचं ठरवलं, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं. 

संविधानातील तरतूदींनुसार राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत, अशी अपेक्षा असते. परंतु काही अपवाद वगळता राजकीय पक्षांकडून बहुतांशी आपापल्या नेतेमंडळींचीच शिफारस या जागांसाठी करण्यात येते. याआधी देखील राज्यपालांनी राज्य सरकारकडून शिफारस करण्यात आलेली काही नावं फेटाळली होती.

त्यात अंजली दमानिया यांच्याकडून एकनाथ खडसे यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आल्याने या यादीत खडसेंचं नाव असल्यास राज्यपालांकडून देखील त्यांच्या नावावर विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा