Advertisement

बिद्रे प्रकरणी राष्ट्रपती पदक मागे घेण्याची प्रक्रीया सुरू


बिद्रे प्रकरणी राष्ट्रपती पदक मागे घेण्याची प्रक्रीया सुरू
SHARES

राज्य पोलीस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आता नियम तपासून बडतर्फ केलं जाईल. याचसोबत कुरुंदकर यांना देण्यात आलेले राष्ट्रपती पदक परत घेण्याची प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली जाईल, असं आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलं.

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आश्वास दिलं.


पुरावे शोधण्याचं काम सुरू

'१४ जुलै २०१६रोजी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणी अभय कुरुंदकर आणि त्यांचे साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनी आधी अश्विनी बिद्रे यांचं अपहरण केलं आणि नंतर त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते वाशी खाडीत टाकले. नौदलाच्या सहाय्याने मृतदेह किंवा त्यासंबंधीचे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

बिद्रे यांच्या राहत्या घरातून विविध पुरावे जमा केले असून त्यांची न्यायवैद्यक चाचणी सुरू आहे. याप्रकरणी ३१ जानेवारी २०१७ ला कुरुंदकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ७ डिसेंबर २०१७ ला अभय कुरुंदकर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचं रणजित पाटील यांनी सांगितलं.

यावर सदस्यांनी कुरुंदकरच्या बडतर्फीची आणि राष्ट्रपती पदक परत घेण्याची मागणी केली. यावर, नियम तपासून कुरुंदकर यांना बडतर्फ करण्यात येईल. तसेच, राष्ट्रपती पदक मागे घेण्याबाबत शिफारस करण्याची प्रक्रीया सुरू असून त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरावा केला जाईल, असंही आश्वासन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा