Advertisement

वडाळ्याची जागा कोळंबकरांना, श्रद्धा जाधव करणार का बंड?

भाजपने मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या यादीत वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी दिल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव चांगल्याच नाराज झाल्या आहेत.

वडाळ्याची जागा कोळंबकरांना, श्रद्धा जाधव करणार का बंड?
SHARES

भाजप आणि शिवसेनेकडून सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा करतानाच दोन्ही पक्षांकडून जागांचा अंतिम आकडा मात्र सांगण्यात आला नाही. युतीत काही जागांवरून मतभेद कायम असल्याने हा आकडा जाहीर होऊ शकला नाही, असं म्हटलं जात आहे. यामध्ये मुंबईतील वडाळ्यातील जागेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. 

भाजपने मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या यादीत वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी दिल्याचं स्पष्ट करण्यात आल्याने शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार आणि माजी महापौर श्रद्धा जाधव चांगल्याच नाराज झाल्या आहेत. जाधव बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

वडाळा मतदारसंघातून मागील ७ वेळेस कालिदास कोळंबकर निवडून आले आहेत. कोळंबकर यापैकी ५ वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. तर २ वेळेस काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे लढलेले कोळंबकर अवघ्या ८०० मतांनी जिंकून आले होते. भाजपच्या मिहीर कोटेचा यांना दुसऱ्या क्रमांकाची तर शिवसेनेच्या हेमंत डोके यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. आता कोळंबकर भाजपात गेल्याने त्यांनी या जागेवर दावा केला होता. 

त्यामुळे वाटाघाटीत भाजपने ही जागा लावून धरत त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. श्रद्धा जाधव गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या नगरसेविका असून त्यांनी महापौरपदही भूषवलं आहे. वडाळयात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी असल्याने श्रद्धा जाधव यांनी या जागेवर दावा केला होता. 

कोळंबकरांना उमेदवारी जाहीर होण्याआधी जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचाही प्रयत्न केला होता.  

 


हेही वाचा-

वडाळ्याची जागा कुणाला? शिवसेनेच्या श्रद्धा जाधव बंडाच्या पवित्र्यात

भाजपची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळालं तिकीट, कुणाचा पत्ता कट?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा