Advertisement

एकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलार

भाजपाचे १२ आमदार आणि राज्यसभेचे एक खासदार पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

एकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलार
SHARES

भाजपाचे १२ आमदार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, भाजपाने ह्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. महाविकास आघाडीतील आमदार फुटण्याची भिती असल्याने अशा खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. भाजपचा एकही आमदार फुटणार नाही, असं भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 

भाजपाचे १२ आमदार आणि राज्यसभेचे एक खासदार पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे.  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी गुरूवारी झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीमुळं आमदार पक्ष सोडण्याच्या शक्यतेला बळ मिळालं. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी निवेदन काढून ही शक्यता फेटाळली आहे. शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून अनेक अपक्ष आमदारांना आश्वासनं दिली गेली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नसल्याने त्यांच्याच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. या भीतीपोटी भाजपमध्ये फूट पडणार असल्याच्या अफवा पसरवण्यात येत आहेत. 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी गुरूवारी भाजपमधील नाराज ओबीसी नेत्यांची बैठक झाली. भाजपमध्ये ओबीसी नेतृत्व संपवलं जात असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. १५ दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याचं यावेळी ठरलं आहे, असं माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं. 



हेही वाचा  -

१२ आमदार भाजपा सोडणार?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा