Advertisement

सरकारचे संकटमोचन, आता तुम्हीच धावून या, आशिष शेलारांची चक्क राऊतांना हाक

शाळा कधी आणि कशा सुरू होणार हे माहीत नाही. महाराष्ट्रात शिक्षणाचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे सरकारचे संकटमोचन, संजय राऊत आता तुम्हीच धावून या, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांना टोमणा मारला आहे.

सरकारचे संकटमोचन, आता तुम्हीच धावून या, आशिष शेलारांची चक्क राऊतांना हाक
SHARES

विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यावरून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पडलेली ठिणगी अजूनही थंड झालेली नाही. याचा प्रत्यय गुरूवारी समूह विद्यापीठाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा आला. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी परीक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचं असं वक्तव्य राज्यपालांसमोर केलं. परंतु अजूनही यासंदर्भात लेखी आदेश काढण्यात आलेला नाही. शाळा कधी आणि कशा सुरू होणार हे माहीत नाही. महाराष्ट्रात शिक्षणाचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे सरकारचे (bjp leader ashish shelar slams cm uddhav thackeray over university final year exams) संकटमोचन, संजय राऊत आता तुम्हीच धावून या, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांना टोमणा मारला आहे.

मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच.आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठाचं उदघाटन राज्यपाल भगतसिंह  कोश्यारी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरूवारी करण्यात आलं. या उदघाटन सोहळयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, समूह विद्यापीठाचे प्रोव्होस्ट डॉ. निरंजन हिरानंदानी, हैद्राबाद सिंध महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विद्यापीठ संस्थामधील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 

हेही वाचा - फायनल इयरची परीक्षा रद्द केल्यामुळे राज्यपाल नाराज, लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

लेखी आदेशच नाही

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे, तर शिक्षण सुरू राहणं महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य केलं. त्यावर निशाणा साधताना आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात, परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचं, पण शाळा कशा व कधी सुरु होणार? माहीत नाही. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परीक्षा रद्द, पण अद्याप याबाबतचा लेखी आदेशच आलेला नाही. त्यामुळे विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी सुरु केली आहे. 

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचं काय?

एका बााजूला मुख्यमंत्री परीक्षा रद्द केल्याचं जाहीर करतात, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परीक्षा घ्या म्हणून राज्यपालांना जाऊन भेटतात. बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परीक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून राज्यपालांना काहीच अवगत केलं जात नाही. पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल ४०% म्हणजे ATKT असलेल्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थी नापास करण्याचं हे षडयंत्र आहे का? तरुणांची एक पिढी उध्वस्त करण्याचं हे षडयंत्र आहे का? उच्च शिक्षणमंत्री म्हणतात योग्य वेळी निर्णय घेऊ? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

अन्यथा संघर्ष 

कोरोनामुळे विद्यार्थी भयभीत आहेत. त्यांच्या पालकांचा नोकरी-धंदा धोक्यात आहे. त्यात सरकारचा “गोंधळात गोंधळ” सुरू आहे. यामुळे दुर्दैवाने विद्यार्थी तणावात आहेत. आता तरुणांचं भविष्य वाचवण्यासाठी "सरकारचे संकटमोचन" संजय राऊत तुम्हीच धावून या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा