Advertisement

बारमध्ये कितीही गर्दी होऊ दे, सरकारचा मात्र अधिवेशनाला नकार, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

अधिवेशन जवळ आलं की, कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा त्या नावाखाली अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो.

बारमध्ये कितीही गर्दी होऊ दे, सरकारचा मात्र अधिवेशनाला नकार, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
SHARES

राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला किंवा बारमध्ये कितीही गर्दी होत असली, तरी अधिवेशनाला मात्र सरकारचा नकार आहे. म्हणूनच केवळ २ दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा निषेध करीत आम्ही या बैठकीचा बहिष्कार केल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

येत्या ५ जुलैपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन ५ व ६ जुलै असं दोनच दिवस ठेवण्यात आलं आहे. केवळ दोन दिवसीय अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर फडणवीस यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

बैठकीतून बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात एक नवीन पद्धत रुढ झाली आहे. अधिवेशन जवळ आलं की, कोरोना वाढल्याच्या बातम्या किंवा त्या नावाखाली अधिवेशन टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. आम्ही या संकटातही सरकारला मदत करीत असताना अधिवेशन न घेण्याकडे राज्य सरकारचा कल आहे.

कुठल्याही प्रश्नावर चर्चा नको

धान उत्पादक, केळी उत्पादक, कोकणातील शेतकरी यांचे प्रचंड प्रश्न आहेत. पण, सरकारला चर्चा नको! विजेचे प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न आहेत, पण, सरकारला चर्चा नको! विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर, पण, सरकारला चर्चा नको! कायदा-सुव्यवस्थेची स्थिती रसातळाला, पण, सरकारला चर्चा नको. 

खरं तर ओबीसी, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यावं, अशी मागणी असताना, आहे ते अधिवेशनही घेणार नाही, अशी राज्य सरकारची भूमिका दिसत आहे. त्यामुळे विविध समाजाच्या मागण्यांनासुद्धा राज्य सरकारने बासनात गुंडाळून ठेवलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केला.

हेही वाचा- ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीत राजकीय चर्चा झालीच नाही- माजिद मेमन

नियम पाळायचेच नाही

महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकशाही बासनात गुंडाळून ठेवण्याची नवी पद्धत रुढ झाली आहे. अध्यक्षीय निवडणुकीसंदर्भातसुद्धा आम्ही मागणी केली. ती निवडणूक अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही. संविधानाने केलेले नियम पाळायचेच नाही, अशी सरकारची भूमिका आहे.

मलिदा खाण्यासाठी एकत्र

तीन पक्षांच्या भानगडीत जनतेला खड्ड्यात का टाकता? तीन पक्षांच्या राजकारणासाठी जनतेचा आणि लोकशाहीचा बळी देणं, हे अतिशय दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री नाराज आहेत का किंवा उपमुख्यमंत्री नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. पण, राज्यातील जनता या सरकारवर प्रचंड नाराज आहे. हे सारे सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. बाहेर काहीही दाखविण्याचा प्रयत्न असला तरी आतून ते एक आहेत. 

काहीही झालं, तरी सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही मांडतच राहणार. अधिवेशनात तर मांडूच. शिवाय सरकार अधिवेशन घेणार नसेल तर रस्त्यावर उतरून या प्रश्नांना वाचा फोडू, अशी भूमिकाही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

(bjp leader devendra fadnavis criticized maha vikas aghadi government on 2 day assembly session)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा