Advertisement

‘मिशन बिगीन अगेन’ घोषणेमुळे गोंधळ वाढला, फडणवीसांचा आरोप

या प्रयत्नात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करू, असं मुख्यमंत्र्यांनी निश्चयपूर्वक म्हणायला हवं होतं, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

‘मिशन बिगीन अगेन’ घोषणेमुळे गोंधळ वाढला, फडणवीसांचा आरोप
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाचव्या टप्प्यातील लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देताना पुन:श्च हरीओम, मिशन बिगीन अगेन यासारख्या घोषणा दिल्या. तर दुसऱ्या बाजूला गरज पडल्यास महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन करावं लागेल, असं वक्तव्यही केलं. यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. दापोलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सरकार अर्थचक्राला हळुहळू गती देण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला या सवलती देऊ करत आहे. त्यासाठी लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात आहे. या प्रयत्नात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करू, असं मुख्यमंत्र्यांनी निश्चयपूर्वक म्हणायला हवं होतं, अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.   

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत करण्यासाठी सरकारनं केलेल्या घोषणा कागदावरच असून त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. उपाययोजना प्रत्यक्षात लागू न झाल्याने कुणालाही मदत मिळालेली नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. आता १० दिवस झाले पण, मदत नाही. अशा आपत्तीत मदत तत्काळ द्यायची असते. वीज नसल्याने बँकांचे व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे रोखीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - नुकसानग्रस्तांना आणखी मोठं पॅकेज? शरद पवारांची मुख्यमंत्र्यांना ‘ही’ सूचना

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत खासगी कार्यालयं १० टक्के मनुष्यबळासह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दुकाने, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने पूर्ण क्षमतेने चालवण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली. व्यवसाय, उद्योगधंदे चालवणारे, नोकरदार, कर्मचाऱ्यांना आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी जाणं-येणं सोईचं व्हावं म्हणून मुंबई महानगर परिसरात प्रवासाला देखील मुभा देण्यात आली आहे. पण रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ लागली आहे.

शिथिलता जीवघेणी ठरू शकते असं वाटलं तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिला. कडाऊन शिथिल झाल्यावर पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी धाकधूक वाटली. सरकारने आरोग्य सुधारण्यासाठी मैदानं किंवा इतर ठिकाणी फिरायला जाण्याची, व्यायाम करायला परवानगी दिलेली आहे, आरोग्य खराब करायला नाही. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही, अजूनही हा लढा संपलेला नाही. त्यामुळे गर्दी टाळा, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा